चंद्रपूर : इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले; महाराष्ट्र-तेलंगणा महामार्ग ठप्प | पुढारी

चंद्रपूर : इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले; महाराष्ट्र-तेलंगणा महामार्ग ठप्प

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 5 दिवसांपासून संततधार पावसामुळे नदी नाले, धरण तुडूंब भरले आहेत. नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली असून वर्धा, वैनगंगा व इरई नदीला पूर आलेला आहे. यामुळे जिह्यातील अनेक मार्गाची वाहतूक बंद झाली आहे. चंद्रपूर शहराला लागून असलेल्या इरई धरणाचे 7 ही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या इरई नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. वर्धा नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने महाराष्ट्र – तेलंगणा मार्गाची वाहतूक ठप्प आहे. वर्धा नदीच्या पूलावरून पाणी वाहत जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. नदी, नाले भरभरून वाहत आहेत. धरणे भरली असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहराला लागून असलेल्या इरई धरणाचे 7 ही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे इरई नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणातील पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील गावांना हाय अलर्टचा इशारा दिलेला होता. त्यादृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे.

महाराष्ट्र – तेलंगणाला राष्ट्रीय माहामार्गावरील वर्धा नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मागील चार तासापासून हा मार्ग बंद आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. पाणी पुलावरून जात असल्याने प्रशासनाने या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. वाहनांची दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. जिल्ह्यातील अनेक धरणे 100 टक्के भरली आहेत.

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी ते राजुरा मार्ग बंद, पुलावरून 2 फूट पाणी

सोईट गावातील वर्धा नदीपात्राची पाण्याची पातळी वाढल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. आज सकाळपासून वाहतूक बंद झाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव ते लाठी दरम्यान वेजगांव नाल्याला आलेल्या पुरामुळे मार्ग बंद आहे. बल्लारपूर तालुक्यातील माना ते चारवट हडस्ती मार्ग ईरइ नदीला आलेल्या पुरामुळे आज सकाळ पासून बंद झाला आहे. लोअर वर्धाचे सात दरवाजे उघडले आहेत. तसेच गोसीखुर्दचे 27 दरवाजे सुरू करण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगेला पूर आला आहे. तर त्या नदी काठालगतचे नाले पूराखाली आहेत. शेतजमीन पाण्याखाली असल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र – तेलंगणा राज्यमार्ग बंद ; पोडसा पुलावरून पाणी

महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा पुल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळं दोन्ही राज्याचा संपर्क तुटला आहे. वर्धा नदीवर असलेला हा पुल क्षतीग्रस्त अवस्थेत होता.त्यामुळं पुलाचे काही स्लॕब कोसळण्याचा धोका वाढला आहे.नदी काठावर असलेल्या पोडसा गावाचा वेशीवर वर्धा नदीचे पाणी आले आहे.गोंडपिपरी-पोडसा मार्गावरील काही पुल पाण्याखाली आहेत.तर उर्वरित पुल पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला आहे.नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे.

जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर

चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, वर्धा, पैनगंगा, इरई, अंधेरी, उमा ह्या प्रमुख नद्या वाहतात. चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संतंतधार पावसामुळे ह्या नद्यांनी पूरचा विळखा घेतलेला आहे. त्यामुळे नदीकाठालगतची शेतजमीन पाण्याखाली आली आहे. मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हयातीली सर्वच धरणे जवळपासू शंभर टक्के भरले आहेत. पूरामुळे कुठे जीवितहानीचे वृत्त नाही.

वरोरा शेगाव चिमूर मार्ग पूर्णपणे बंद

वरोरा शेगाव चिमूर महामार्गाचे काम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे . कंपनीने संथ गतीने काम केल्यामुळे वारंवार वरोरा चिमूर रोड बंद होत होता. पुलाचे काम पूर्ण न केल्यामुळे आधीच बामण डोह नाल्यावर पर्यायी मार्ग काढण्यात आला होता. परंतु पुराच्या पाण्याने हा पर्यायी मार्ग वाहून गेल्याने आठ दिवसांपासून हा मार्ग बंद आहे. आठ दिवसांपासून वरोरा शेगाव मार्गाची वाहतूक ठप्प आहे. पर्यायी मार्ग म्हणून प्रवासी शेगाव खेमजई टेमुर्डा या मार्गाने प्रवास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button