नागपूर येथील चार धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

नागपूर येथील चार धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यात दमदार पावसामुळे नवेगाव खैरी, गोरेवाडा, नांद आणि वेणा या चार लहान आणि मध्यम धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कन्हान, पेंच, वेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात पावसामुळे कन्हान, पेंच, वेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील नदी काठच्या गावांना येणाऱ्या काळात पुराचा धोका आहे. त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही कुही तालुक्यातील काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात कोणतीही माहिती द्यायची असल्यास किंवा मदत आवश्यक असल्यास मदतीसाठी 0712-2562668 या क्रमांकावर किंवा टोल फ्री क्रमांक 1077 चा वापर करावा.
काल दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु असल्यामुळे अनेक तालुक्यात सखल भागात पाणी साचले. विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या धापेवाडामध्ये चंद्रभागा नदीला पूर आले असून नदीचे पाणी ओसंडून वाहत आहे. चंद्रभागा नदीचे पाणी विठ्ठल मंदिराच्या परिसरातही शिरले आहे.
सावनेर तालुक्यातील केळवद परिसरातील कपिलेश्वर मंदिर आणि त्याच्या अवतीभवती काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मंदिराच्या अवतीभवतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल 164 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सकाळी देखील पाऊस सुरु असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सिंचन विभागाने धरणाचे आठ दार उघडले असून त्यातून 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. आजही जर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिला आणि पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला तर संध्याकाळपर्यंत पेंच आणि कन्हान नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढून काठावरील वस्त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गोरेवाडा धरणाचे सर्व चार स्वयंचलित गेट उघडण्यात आले आहे. गोरेवाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे स्वयंचलित गेट आज सकाळपासून उघडले आहे. त्यामुळे पिवळी नदीची पाणी पातळी वाढली आहे.  परिणामी उत्तर नागपुरातील पिवळी नदीच्या काठावरील वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कामठी तालुक्यात ही दमदार पावसामुळे अनेक गावे आणि वस्त्याना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा

Back to top button