बीड : विहिरीत पडलेल्या उदमांजराला वनविभागाने दिले जीवदान | पुढारी

बीड : विहिरीत पडलेल्या उदमांजराला वनविभागाने दिले जीवदान

केज; पुढारी वृत्तसेवा : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या एका उदमांजराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले. विहिरीत जाळे सोडून मोठ्या प्रयत्नाने उदमांजराला पकडून शेतात सोडण्यात आले. उदमांजराला बाहेर काढण्यासाठी आज (दि.४) सकाळी तब्बल पावणे दोन तास वनविभागाचे रेस्क्यू चालले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. ३) सायंकाळी माळेगाव (ता. केज) येथील राम जाधव यांच्या विहिरीत एक उदमांजर पडले. राम जाधव यांनी ही माहिती धारूर वनविभागाला कळविली. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता धारूर वनविभागाचे वनरक्षक शंकर वरवडे यांच्या सुचनेवरून वचिष्ट भालेराव, शाम गायसमुद्रे, विलास मुंडे आणि जीवन गोके हे कर्मचारी माळेगाव येथे दाखल झाले. त्यांनी विहिरीत जाळे सोडून मोठ्या प्रयत्नाने उदमांजर जाळ्यात पकडले आणि शेतात सोडून दिले.

सकाळी ११ वाजल्यापासून उदमांजराला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. त्याला पकडण्यासाठी जाळे टाकण्यात आले, परंतु उदमांजर जाळ्यात येत नव्हते. अखेर पावणे एक च्या सुमारास उदमांजराला पकडण्यात वनविभागाला यश आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button