बीड : कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

बीड : कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

गेवराई: पुढारी वृत्तसेवा: बँकेकडून घेतलेले २ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून एका ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील मारफळा येथे घडली. या घटनेमुळे मारफळा गावात खळबळ उडाली आहे. भीमराव देवराव कुटे (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गेवराई तालुक्यातील मारफळा येथील अल्पभूधारक शेतकरी भीमराव कुठे यांनी बँकेकडून आपल्या शेतीवर २ लाख ७० हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र, मागील वर्षी खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. यासोबतच रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. या नैराश्यातून त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

कुठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

भीमराव कुटे त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याने कुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे मारफळा गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button