पिंपरी : ओटा स्किममधून पाच किलो गांजा जप्त | पुढारी

पिंपरी : ओटा स्किममधून पाच किलो गांजा जप्त

पिंपरी : निगडी येथील ओटा स्किम परिसरात छापा मारून पोलिसांनी पाच किलो 126 ग्रॅम गांजा जप्त केला. शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सावळा शिवाजी खाडे (रा. सिद्धार्थनगर, निगडी) आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्किम येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टीत एका महिलेकडे गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी महिलेच्या घरावर छापा मारून कारवाई केली.

यामध्ये तीस हजार 760 रुपयांचा एक किलो 210 ग्रॅम गांजा मिळून आला. आरोपी महिलेने गांजा दुस-या महिलेकडून आणला असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आणखी एका महिलेच्या घरी छापा मारला. त्यावेळी तिच्या घरातही पोलिसांना एक लाख नऊ हजार 800 रुपयांचा तीन किलो 916 ग्रॅम गांजा मिळाला.

संबंधित महिलेने आरोपी सावळा खाडे यांच्याकडून गांजा आणल्याचे पोलीस तपासात समोर आले. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी मिळून पोलिसांनी पाच किलो 126 ग्रॅम वजनाचा एक लाख 40 हजार 560 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button