नांदेड : पोलिसांचा सच्चा साथीदार ‘मॅक्स’वर काळाची झडप

नांदेड : पोलिसांचा सच्चा साथीदार ‘मॅक्स’वर काळाची झडप

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : व्हीआयपी बंदोबस्त, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, विमानतळ, रेल्वेस्टेशन आणि गुरुद्वारा येथे बॉम्बशोधकाचे काम प्रामाणिकपणे पार पाडणारा पोलिस दलाचा सच्चा साथीदार 'मॅक्स'चे गुरुवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. 'मॅक्स'च्या निधनाने पोलिस दलात दुःखाचे वातावरण आहे. 'मॅक्स' हा श्वान असला तरीही तो सदैव पोलिसांच्या मनात कायम घर करून राहील, यात शंका नाही.

क्लिष्ट आणि तेवढ्याच आव्हानात्मक गुन्ह्यांची उकल करताना कधी -कधी पोलिसांना असंख्य संकटांना सामोरे जावे लागते. परंतु याच आव्हानात्मक परिस्थितीत त्यांना मोलाची मदत होते, ती श्वान पथकाची. पथकातील श्वान आपले कर्तव्य बजावताना अगदी जिवाचीही पर्वा करत नाहीत ते अतिशय निष्ठेने आपले कर्तव्य बजावतात. या श्वानांना अतिशय चोख आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते.

पोलिस दलात उत्तम जातिवंत, हुशार, चपळ श्वानांची निवड केली जाते. शासनाने प्रमाणित केलेल्या प्रजोत्पादन केंद्राकडून हे श्वान प्राप्त केले जातात. पोलिस दलाकडून या श्वानाच्या कामाची पूर्ण दखल घेतली जाते.नांदेड पोलिस दलात एकूण 11 प्रशिक्षित श्वान आहेत. गजानन पल्लेवार आणि सोमेश तोटावार या दोन पोलिस कर्मचार्‍यांवर या श्वानांच्या देखभालीची जबाबदारी आहे. मॅक्स हा बॉम्बशोधक श्वान होता. व्हीआयपींचे दौरे, सभांचा बंदोबस्त तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक, विमानतळ येथे 'मॅक्स'ने आपले कर्तव्य अगदी निष्ठेने बजावले.

पुणे, नाशिक, हिंगोली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेेसाठी बॉम्बशोधकाचे काम करण्यासाठी मॅक्सला पाचारण करण्यात आले होते. प्रत्येकवेळी 'मॅक्स'ने आपले काम चोखपणे बजावले. काही दिवसांपासून 'मॅक्स'ला कोणत्यातरी आजाराने ग्रासले होते. त्याच्यावर नांदेड व उदगीर येथील श्वान रुग्णालयात उपचार सुरू होते. येथील डॉक्टरांनी 'मॅक्स'ची किडनी खराब झाल्याचे निदान केले आणि तसा अहवालही पोलिस दलाला सुपूर्द केला होता. आजारी 'मॅक्स'ची कुटुंबातील एखाद्या सदस्यांप्रमाणे पोलिसांनी काळजी घेतली. परंतु अखेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास मॅक्सने पोलिस दलासह जगाचाही निरोप घेतला. शुक्रवारी सकाळी 'मॅक्स'वर पोलिस श्वान पथक कार्यालय परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 'मॅक्स'ला मानवंदनाही देण्यात आली. यावेळी वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती होती. 'मॅक्स'चे वय साडेपाच वर्षे होते.

राज्य व केंद्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या दौर्‍याच्या वेळी मॅक्सने महत्त्वाची कामगिरी बजावली. मॅक्स हा पोलिस दलाचा अविभाज्य भाग होता. त्याच्यावर सर्वतोपरी उपचार करण्यात आले. परंतु दुर्दैवाने आम्ही त्याचा जीव वाचवू शकलो नाहीत.
प्रमोदकुमार शेवाळे, पोलिस अधीक्षक

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news