जालना : उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचा मोर्चा | पुढारी

जालना : उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचा मोर्चा

जालना, पुढारी वृत्तसेवा ः शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मंगळवारी मामा चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. हा मोर्चा गांधी चमनपर्यंत काढण्यात आला.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ व बंडखोरांच्या विरोधात जालन्यातील मामा चौकातून शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवाजीराव चोथे, हिकमत उढाण, जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आ. संतोष सांबरे, माजी जि. प.अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, युवा नेते अभिमन्यू खोतकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मामा चौकातून निघालेला हा मोर्चा मस्तगड मार्गे गांधी चमन येथे आला. चालवित होता पानपट्टी, जनता करील तुझी हकालपट्टी, घेऊन हाती भगवा, गद्दारांना जागा दाखवा, शिवसेनेमुळे तुम्ही निवडून आले, गद्दारी करून चोरांना मिळाले आदी घोषणांचे फलक या मोर्चात सहभागी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हातात होते.

मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चानंतर शिवसैनिकांसमोर बोलताना चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता दाढीवाल्या रिक्षावाल्याजवळ एवढा पैसा आला कोठून? असा सवाल करीत टरबुजाने बंडखोराचा खर्च केल्याचा आरोप केला. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी जे सोडून गेले, त्यांच्या छाताडावर बसून पुन्हा उध्दव ठाकरे यांना गादीवर बसवू असे सांगत एक-एक शिवसैनिकांचे लाखलाख शिवसैनिक करू, असा निर्धार व्यक्त केला. भास्करराव आंबेकर यांनी कर्नाटक व मध्यप्रदेशात भाजपाने जे केले, तेच महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे सांगून येणार्‍या निवडणुकीत शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा इशारा दिला. शिवसेना व ठाकरे हे समीकरण कोणीही तोडू शकणार नाही, असे अभिमन्यू खोतकर यांनी सांगितले.

जालना शहरात शिवसेनेच्या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक मार्गावरील वाहतुकीत बदल करून ती इतर मार्गाने वळविण्यात आली होती. मोर्चात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिवसैनिक सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button