लातूर : डास प्रतिबंधासाठी मनपाची अ‍ॅबेटिंग मोहीम | पुढारी

लातूर : डास प्रतिबंधासाठी मनपाची अ‍ॅबेटिंग मोहीम

लातूर : पुढारी वृत्तसेवा : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याने डेंग्यू, चिकुनगुन्या, हिवताप प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून याला वेळीच आवर घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत शहरात कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. लवकरच अबेटिंग मोहीमही सुरू करण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
डेंग्यू ताप प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजनेतील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन सांडपाण्याच्या
टाक्यांतील पाणीसाठ्यात डास अळींची उत्पत्ती झाली आहे का, याची तपासणी करण्यात येणार आहे.

नागरिकांनी साठवलेले पाणी उघडे न ठेवता झाकून ठेवावे. झाकण असलेल्याच टाक्यांचा वापर करावा. फुटक्या व झाकता न येऊ शकणार्‍या टाक्या वापरू नये. टाक्यांना झाकणे नसल्यास झाकणे बसवून घ्यावीत. निरुपयोगी, भंगार साहित्य छतावर, अंगणात न ठेवता ते घंटागाडीकडे द्यावे. नळाखाली, परिसरात खड्डे असल्यास बुजवून घ्यावेत. साचलेले पाणी काढून टाकावे किंवा साचलेल्या पाण्यात खराब ऑईल टाकावे. फुलदाणीतील पाणी नियमितपणे बदलावे. कूलर व फ्रीजच्या डिफ्रॉस्ट प्लेटमधील पाणी नियमित बदलावे. शरीर झाकण्यासाठी पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत.

डास चावू नयेत म्हणून लहान मुला-मुलींना लांब बाह्यांचे शर्ट व पॅन्ट, सलवार व कमीज, लेगीन्स यांसारख्या कपड्यांचा वापर करावा. लहान मुलांना कोपर्‍यामध्ये, पलंगाखाली, अंधार्‍या जागेत बसण्यास व  खेळण्यास प्रतिबंध करावा. खिडक्यांना जाळ्या बसवून घ्याव्यात. सेप्टिक टँकच्या व्हेंट पाइपला जाळी बसवावी. झोपतेवेळी मच्छरदाणीचा वापर करावा. जर थंडी वाजून, कोणत्याही कारणात्सव ताप येत असेल तर शासकीय, मनपा रुग्णालय अथवा मनपाचे नागरी आरोग्य केंद्र येथे डॉक्टरकडून तपासणी करुन घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार घेऊ नये, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

तो दावा अन् वास्तव शहरात नाले सफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा मनपा प्रशासन करीत असले, तरी अजूनही अनेक भागांत हे काम पूर्णत्वास गेले नाही. गटारे तुंबली असून, त्याचे पाणी चक्क रसत्यावर थांबत आहे. तुंबलेली गटारे डासोत्पतीची केंद्रे बनत असून, गटारातील पाण्याची दुर्गंधी त्या परिसरातील नागरिकांना त्रासदायक होत आहे, तथापि हा प्रश्न मनपा प्रशासन फारसे गांर्भीयाने घेत नसल्याचे चित्र आहे. आयुक्तांनी वेळ काढून पाहणी करावी वास्तव कळेल.

हेही वाचलंत का ?

Back to top button