दौंड : भीमाकाठच्या शेतकर्‍यांचा आंतरपिकांकडे कल | पुढारी

दौंड : भीमाकाठच्या शेतकर्‍यांचा आंतरपिकांकडे कल

नानगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठचे शेतकरी शेतातील मुख्य पिकांबरोबर आंतरपिकांनाही महत्त्व देत आहेत. मुख्य पिकांबरोबरच आंतरपिकातूनही फायदा होत असल्याने दिवसेंदिवस या भागात शेतकरी आंतरपिकावर भर देत आहेत.

भीमा नदीकाठचा भाग असल्यामुळे या भागात बाराही महिने पाणी उपलब्ध असते. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊसशेती करताना दिसतात. पूर्वी फक्त उसाचे पीकच घेतले जात होते. मात्र, सध्या शेतकरी ऊसशेतातही आंतरपिके घेत आहेत. मुख्य पिकांचा वाढीचा व काढणीचा कालावधी मोठा असल्यामुळे आंतरपिके घेणे फायदेशीर ठरत आहे.

पूर्वी शेतकरी उसाची लागण सरीवर जवळजवळ करीत होते. मात्र, सध्या बरेचसे शेतकरी ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धतीचा वापर करीत आहेत. पट्टा पद्धतीमध्ये उसाच्या दोन सर्‍यांमधील मोकळ्या जागेत शेतकरी कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, गवार, भेंडी, मुळा, बीट, गाजर तसेच भाजीपाला पिके घेतात. मुख्य पिकांचे उत्पन्न येईपर्यंत आंतरपिकांमधून शेतकर्‍यांना थोडाफार आर्थिक नफा होत रोजचा खर्च भागविला जातो. तसेच, वेगवेगळ्या पिकांमुळे शेतीला चांगला बेवड (पीक अवशेष) मिळून पुढील मुख्य पिकांना फायदाही होतो. परिणामी, दुहेरी फायद्यामुळे शेतकर्‍यांचा आंतरपिकांकडे कल दिसून येत आहे.

Back to top button