विद्युत तारा : लोंबकळणार्‍या तारांनी जीव टांगणीला | पुढारी

विद्युत तारा : लोंबकळणार्‍या तारांनी जीव टांगणीला

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव येथील शिक्षकनगरात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांमुळे नागरिकांचा
जीव अक्षरश: टांगणीला लागला आहे. या तारांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रामुळे
विस्तारलेल्या रांजणगावची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.

रांजणगाव येथील शिक्षकनगरात महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे विद्युत तारा जमिनीपासून अवघ्या सात-आठ फुटांवर लोंबकळत आहेत. जोरदार वारे सुटल्यास या विद्युत तारा एकमेकांना चिकटून रस्त्यावर नेहमी ठिणग्या पडतात. यामुळे विद्युत तारा तुटून खाली पडण्याच्या घटना घडल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांना पीव्हीसी पाइपचे आवरण
घालण्यात आले आहे.

एका ठिकाणी विद्युत तारेला असलेल्या जोडामुळे विशेष करून पावसाळ्यात नागरिकांना खबरदारी घेऊनच या ठिकाणावरून ये-जा करावी लागते. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन लोंबकळणार्‍या विद्युत तारांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. रांजणगाव येथील शिक्षकनगरात विद्युत तारा जमिनीपासून अवघ्या सात-आठ फुटांवर अशा प्रकारे लोंबकळत आहेत.

Back to top button