हिंगोली : शेती परवडत नसल्याचे सांगून मागितले हेलिकॉप्टर खरेदीसाठी साडेसहा कोटीचे कर्ज | पुढारी

हिंगोली : शेती परवडत नसल्याचे सांगून मागितले हेलिकॉप्टर खरेदीसाठी साडेसहा कोटीचे कर्ज

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: सततची नापिकी व वाढलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे अनेकांनी शेती सोडून इतर पर्याय शोधले आहेत. शेतामध्ये काही राम नाही असे म्हणत अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. याच दरम्यान सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील एका युवा शेतकर्‍याने तर चक्क शेती व्यवसाय बदलून दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी ६ कोटी ६५ लाख रूपयांचे कर्ज मागितले. यात हेलिकॉप्टर खरेदीसाठी कर्ज हवे आहे असा अर्ज शाखाधिकार्‍याकडे देण्यात आला आहे. मात्र, हा अर्ज शाखाधिकार्‍याच्या हातात पडताच बँकेचे अधिकारी अवाक झाले आहेत.

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास पतंगे यांनी बुधवारी (दि.१५) रोजी गोरेगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकार्‍यांची भेट घेवून हेलिकॉप्टर खरेदीसाठी ६ कोटी ६५ लाखाचे कर्ज मागितले होते. विशेष म्हणजे, पतंगे यांनी कर्ज मागणीचा रितसर अर्ज शाखाधिकार्‍यांच्या हातावर टेकविला. पतंगे यांच्याकडे दोन एकर जमीन असून शेती परवडत नसल्याचे कारण सांगत हेलिकॉप्टर खरेदी करावे वाटत असल्याचे त्यांनी त्याच नमूद केले आहे. एरवी बँकांकडून पिककर्जासाठी शेतकर्‍यांची अडवणूक होत असताना पतंगे यांनी चक्क साडेसहा कोटीचे कर्ज हेलिकॉप्टर खरेदीसाठी मागितले आहे. त्यामुळे शाखाधिकारी कैलास पतंगे यांच्याकडे अवाक होवून एकटक पाहतच राहिले.

याबबातची माहिती अशी की, कैलास पतंगे यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीतून उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांनी हेलिकॉप्टर खरेदीचा निर्धार केला आहे. वेळ आल्यास शेती विकण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे. परंतु, शेतीची विक्री करूनही हेलिकॉप्टर खरेदीसाठी रक्कम पुरेशी होत नसल्याने अखेर पतंगे यांनी बँकेकडे साडेसहा कोटीच्या कर्जाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, हेलिकॉप्टर खरेदी करून त्याचा व्यवसाय केल्यास प्रतीतास ६५ हजार रूपये मिळतात. त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा विचार पतंगे यांनी केला आहे.

हेलिकॉप्टर खरेदीचा निर्धार

माझ्याकडे दोन एकर शेती असून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीच्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने इतर पर्यायी व्यवसाय करण्याचा मार्ग शोधला. परंतु, त्यामध्येही मोठी स्पर्धा असल्याने हेलिकॉप्टरची खरेदी करून ते भाड्याने दिल्यास चांगला नफा मिळतो असे माझ्या वाचण्यात आल्याने मी बँकेकडे साडेसहा कोटीच्या कर्जाची मागणी केल्याचे कैलास पतंगे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button