बीड : पोटच्या पोरानेच कोयत्याने बापावर वार करत पाठविले यमसदनी

बीड : पोटच्या पोरानेच कोयत्याने बापावर वार करत पाठविले यमसदनी

केज (बीड) ; गौतम बचुटे : कोयत्याने वार करून वडिलांचा खून करून मृतदेह सोयाबीनच्या भुसकटात लपवून ठेवल्याची घटना घडली. केज तालुक्यातील साळेगाव येथे पारखे यांच्या माळावर मांगवडगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेस ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी स्वतः हून जवळच्या पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यामुळे सदर खुनाचा प्रकार उघडकिस आला.

मंगळवारी (दि.१४ जून) दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेतील आरोपीचे नाव पवन शिवाजी हंकारे (वय २६ वर्ष) असे आहे. केज तालुक्यातील हा तरूण त्याचे वडील शिवाजी केशव हंकारे (वय ५५ वर्ष) यांना जवळबन येथून मोटार सायकलवर बसवून साळेगाव येथे घेऊन आला. गावाच्या दक्षिण दिशेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणच्या पारखेचा माळ भागात येऊन दोघे एकत्र दारू प्यायले.

आधी हाताने मारहाण, नंतर कोयत्याने वार

तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता ? असा पवन याने त्याचे वडील शिवाजी हंकारे यांना जाब विचारला. दुपारी २:३० ते ३:०० च्या दरम्यान दोघात बाचाबाची झाली. पवन याने दारूच्या नशेत असलेले वडिल शिवाजी हंकारे यांना अगोदर हाताने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने हातावर व पायावर सपासप वार केले. शिवाजी हंकारे हे दारूच्या नशेत असल्याने प्रतिकार करू शकले नाहीत. त्यानंतर पवनने त्याचे वडिलांच्या मानेवर आणि तोंडावर कोयत्याने जवळपास ९ ते १० वार केले. त्यामुळे अतिरक्तस्रावाने शिवाजी हंकारे याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या मारेकरी मुलाने वडिलांचा खून केल्याचा कोणाला संशय येऊ नये यासाठी मृतदेह सोयाबीनच्या भुसकटात लपवून ठेवला.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतच मृतदेह लपवल्याची दिली कबुली

त्यानंतर पवन हंकारे हा (दि. १५ जून) बुधवारी दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान स्वतः युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वतःच्या वडिलांचा खून करून प्रेत केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळेगाव शिवारात लपवून ठेवले असल्याची माहिती देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना दिली.

सुरुवातीला डॉ. दहीफळे यांना हा युवक वेडसर किंवा नशेत असल्याची अशी शंका आली. परंतु त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी घटना घडलेल्या ठिकाणी सदर युवक पवन हंकारे याला सोबत घेऊन आले. यावेळी साळेगाव येथील केज-कळंब रोडवरील सदाशिव पारखे यांच्या शेतातील सोयाबीनच्या भुस्कटात प्रेत झाकून ठेवलेले आढळले.

पोलीस घटनास्थळी हजर

त्यानंतर तात्काळ सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे घटनास्थळी हजर झाले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुनाच्या घटनेची माहिती दिली. प्रेताचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठविण्यात आला. दरम्यान बापाचा खून करणारा करंटा खुनी मुलगा पवन हंकारे यास केज पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांची भेट :- या खुनाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांना तपास संदर्भात सूचना दिल्या. तसेच घटनास्थळी पोलिसांचे आय-बाईक पथक आणि न्यायवैद्यक पथक हे देखील उपस्थित होते त्यांनी खुनाचे पुरावे जमा करण्यासाठी नमुने ताब्यात घेतले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news