डोंबिवली : अश्लील व्हिडिओ वायरल करण्याच्या धमकींना नका पडू बळी; पोलिसांचे आवाहन | पुढारी

डोंबिवली : अश्लील व्हिडिओ वायरल करण्याच्या धमकींना नका पडू बळी; पोलिसांचे आवाहन

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्व येथील एका तरुणीवर आठ जणांनी मिळून मानसिक आणि शाररिक छळ केला. या सगळ्याला कंटाळून त्या तरुणीने आत्महत्या केली. या सगळ्या प्रकरणात कल्याण मधील उच्चभ्रू घरातील मुलांचा समावेश आहे. याआधी देखील अशा प्रकरच्या अनेक घटना कल्याण डोंबिवलीमध्ये घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस कल्याण परिमंडळ ३ मधून चक्क पोलिसांनी महिलांना आवाहन केले आहे. कोणी अश्लील व्हिडिओ बनवून जर ब्लॅकमेलिंग करत असेल तर कृपया त्याला बळी न पडता महिलांनी किंवा मुलींनी पोलीस स्थानक गाठावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण पूर्व परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मयत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. सुसाईड नोट मधील मजकुरामुळे पोलीस ही थक्क झाले. सदर मयत तरुणीला याच परिसरात राहणारे सात तरुण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते.

नराधमांमध्ये एका तरुणीचा समावेश

धक्कादायक बाब म्हणजे या सात विकृत नराधमांमध्ये एक तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी मदत करत होती. ही तरुणी पीडितेची मैत्रीण होती. पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र २३ सप्टेंबर २०२१ रोजी डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंद झाला होता. यामध्ये देखील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला. त्यानंतर त्या व्हिडिओची भीती दाखवत एक नाही तर तब्बल ३३ जणांनी तिच्यावर अत्याचार केला होता. मात्र याच पार्श्वभूमीवर महिलांनी घाबरून कोणतीही गोष्ट लपवू नये. तसेच त्वरित पोलीस स्थानक गाठावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांचे आवाहन

कल्याण परिमंडळ ३ येथील पोलिसांनी महिलांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. त्याचबरोबर त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण करण्याचे अनेक प्रकार नजीकच्या कालावधीत उघडकीस आले आहेत. अशा प्रकरणात असे निदर्शनास आले आहे, की पीडित महिला मुली यांची बदनामी होईल या कारणास्तव पोलिसात तक्रार देण्यास पुढे येत नाही. पोलिसांनी आवाहन केले आहे की, महिलांचे अशा प्रकारे शोषण होत असल्याची बाब निदर्शनास आल्यास सदरची माहिती नजीकच्या पोलीस ठाणे येथे किंवा नियंत्रण कक्ष ठाणे शहर येथे किंवा 022- 25443636 या क्रमांकावर फोन करून त्वरित कळवावी. जेणे करून समाजातील अपप्रवृत्तीवर कारवाई करता येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button