बीड : पुढारी वृत्तसेवा : राज्यात खळबळ उडवून देणार्या बीड येथील गर्भपात प्रकरणात (Beed abortion case) पाच जणांवर गुन्हा नोंद झाला होता. यातील सीमा सुरेश डोंगरे (रा. शिक्षक कॉलनी, बीड) या परिचारिकेने (नर्स ) बिंदूसरा धरणात आत्महत्या केली. आज (दि.८) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता मृतदेह सीमा डोंगरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सीमाचा अवैध गर्भपात प्रकरणात सहभाग असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले होते. या प्रकरामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी अवैध गर्भपात (Beed abortion case) करताना एका महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेला याआधी तीन मुली होत्या. चौथ्यांदा गर्भवती असताना गर्भपात करण्यात आला. अति रक्तस्त्राव झाल्याने गंभीर अवस्थेत एका खासगी दवाखान्यात व नंतर जिल्हा रूग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आले. यावेळी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासले असता त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात अवैध गर्भपात करताना मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान मयत महिलेचा पती व नातेवाईकांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी गर्भनिदान करणार्या डॉक्टर महिलेचे नाव सांगितले. तसेच गावी गोठ्यात गर्भपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा गर्भपात एका परिचारिकेच्या मदतीने करण्यात आल्याचेही उघडकीस आले होते. दरम्यान, या प्रकरणी पाच जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
हेही वाचलंत का ?