हिंगोली- परभणी राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीचा अपघात; एक गंभीर जखमी | पुढारी

हिंगोली- परभणी राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीचा अपघात; एक गंभीर जखमी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली – परभणी राष्ट्रीय महामार्गावरील आसोला पाटीजवळ दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहीतीनुसार, असोला येथून शेख हाजी शेख मुसा हे दुचाकीवरून परभणीकडे निघाले होते. असोला पाटी जवळ दोन दुचाकींनी त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यामुळे शेख हाजी शेख मुसा यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यादरम्यान दुसऱ्या दुचाकीचालकाने दुचाकीसह पळ काढला.

महिनाभरापूर्वी याच ठिकाणी दुचाकीवरुन जाणाऱ्या एका जोडप्याचादेखील भीषण अपघात झाला होता. त्यामुळे अपघाताच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांकडून केली जात आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात मागील एक महिन्यात झालेल्या अपघाताच्या मालिकेनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात 6 जून रोजी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीस पोलीस विभाग, बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. यावेळी जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या अपघातात या ठिकाणचे ब्लॅक स्पॉट जाहीर करून त्या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करणे, तसेच हिंगोली ते रिसोड या राष्ट्रीय मार्गावर काही ठिकाणी दुरुस्ती आवश्यक असून त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला याबाबत सूचना दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button