मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दाखल; पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण आणि गोव्यात पोहोचणार | पुढारी

मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दाखल; पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण आणि गोव्यात पोहोचणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अनुकूल स्थितीचा प्रभाव वाढल्यामुळे मान्सूनचा प्रवास आणखी सुकर झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत (दि. 2 किंवा 3 जून) मान्सून कोकण आणि गोव्यात पोहोचणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी वर्तविला आहे. दोन दिवसांपूर्वीच मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाल्यानंतर आगमनालाच या भागात मुसळधार पावसाने सुरुवात केली.

दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून ते उत्तर केरळ व उत्तर कर्नाटकची किनारपट्टी ते पुढे दक्षिण बंगालची किनारपट्टी तसेच दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत (केरळ व तामिळनाडूची किनारपट्टी पार करून) चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच हरियाणापासून बांगला देशपर्यंत, दक्षिण उत्तर प्रदेश, दक्षिण बिहार, झारखंड, गॅगस्टीक, पश्चिम बंगाल पार करून आणखी एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही स्थितींमुळे मान्सूनचा पुढील प्रवास सोपा झाला आहे.

कोकण आणि गोव्याबरोबरच मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व, पश्चिम मध्य पूर्व भाग, ईशान्य बंगाल तसेच हिमालयीन भागाबरोबरच पश्चिम बंगालचा काही भाग व्यापणार आहे.

Back to top button