जालना : ८ एकर ऊस तोडणीअभावी उभा, शेतकरी पती-पत्नीचा कीटकनाशक घेऊन आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

जालना : ८ एकर ऊस तोडणीअभावी उभा, शेतकरी पती-पत्नीचा कीटकनाशक घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

जालना ; पुढारी वृत्तसेवा : जालना साखर कारखाना ऊस तोडणी करायला तयार नसल्याने, घनसावंगी तालुक्यातील भोगाव गावच्या पती – पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.27) कीटकनाशक घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कदीम जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पती – पत्नीला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

घनसावंगी तालुक्यातील भोगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी पती-पत्नीने कीटकनाशक हातात घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. सुभाष सराटे आणि मीरा सराटे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचे नाव असून, त्यांचा ८ एकर ऊस तोडणीअभावी उभा आहे. बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या करूनही साखर कारखाना ऊस तोड करायला तयार नसल्याचे त्यांचे मत आहे. दरम्यान, त्यामुळे आलेल्या विवंचनेतून पती-पत्नीने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच किटकनाशकाची बाटली आणून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

जिल्हाविशेष शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शौकत सय्यद यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की सदरील पती-पत्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषप्राशन करून आत्महत्या करणार आहेत त्यावरून शौकत सय्यद यांनी तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना आणि तालुका जालना पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांच्या फौजफाटा बोलावून पती-पत्नीला ताब्यात घेतले.

कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद मझहर, तालुका पो. ठाण्याचे सहा.पो. निरि. वडते, गांगे, जिल्हा विशेष शाखेचे पो. हेडकाँ. शौकत सय्यद यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पती-पत्नीला ताब्यात घेतले. त्यांच्या हातातील कीटकनाशकांची बाटली हिसकावून घेतल्याने पुढचा अनर्थ टळला आहे. कदीम जालना पोलिसांनी पुढील तपासकामी या पती- पत्नीला तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button