Hingoli : आखाडा बाळापूरच्या बेपत्ता तरुणाचा संशयास्पद मृत्यू; कुर्तडी शिवाराच्या कालव्यात सापडला मृतदेह | पुढारी

Hingoli : आखाडा बाळापूरच्या बेपत्ता तरुणाचा संशयास्पद मृत्यू; कुर्तडी शिवाराच्या कालव्यात सापडला मृतदेह

हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली (Hingoli)  आखाडा-बाळापूर येथील बेपत्ता तरूणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी कुर्तडी शिवारातील कालव्याच्या पाण्यात अढळून आला. हनुमान नगर भागातील असलेल्या तरुणाचे नाव शंकर नाथोजी कोठुळे ( 22 ) असे आहे. या संबंधित तरूणाच्या मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

आखाडा-बाळापूर येथील हनुमान नगर भागातील शंकर कोठूळे हा एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. मंगळवारपासून तो बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यानंतर या प्रकाराची माहिती आखाडा-बाळापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनीही त्याचा शोध सुरू केला. दरम्यान गुरूवारी दुपारी कुर्तडी शिवारातील कालव्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख बाबर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह सापडल्याची माहिती सोशल मीडियावर टाकली होती. तसेच पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या शंकरच्या कुटुंबियांनाही घटनास्थळी बोलविण्यात आले. त्याच्या कुटुंबियांनी सदर मृतदेह शंकरचा असल्याचे सांगितले. याप्रकरणी आखाडा-बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button