हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील (Hingoli) विरेगाव येथे पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी आज हट्टा पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद झाली नाही. वंदना गुलाब लोखंडे (45) व गुलाब उर्फ नारायण लोखंडे (47) असे आत्महत्या केलेल्या पती व पत्नीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.कौटुंबिक कलहातून पती-पत्नीने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमुळे तीन मुलांवर मात्र अनाथ होण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे विरगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.
वसमत तालुक्यातील विरेगाव येथे गुलाब उर्फ नारायण लोखंडे यांचे पत्नी वंदना व तीन मुले असे कुटुंब राहते. गुलाब यांचा उदरनिर्वाह शेती उत्पन्नावर चालत होता. बुधवारी दुपारी लोखंडे दाम्पत्यामध्ये वाद झाला. या वादानंतर वंदना यांनी कालव्याच्या पाण्यात उडी मारली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकर्यांनी त्यांचा शोध सुरू केला. दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. पत्नीने कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पती गुलाब लोखंडे यांना मिळाली. या घटनेचे दु:ख अनावर न झाल्याने त्यांनी देखील शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, गुलाब लोखंडे यांनी शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक पठाण, जमादार राजू ठाकूर, संदीप सुरोशे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. दोन्ही मृतदेहांवर हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणात आज सकाळपर्यंत हट्टा पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा