Yasin Malik Terror Funding Case : टेरर फंडिंग प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा | पुढारी

Yasin Malik Terror Funding Case : टेरर फंडिंग प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दहा लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यात यासीन मलिकची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

दरम्यान, काश्मीर खोर्‍यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कडक नजर ठेवली आहे. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी १९ मे रोजी यासीनला UAPA दोषी ठरवले होते. यासीनच्या खटल्याच्या सुनावणीमुळे पटियाला हाऊस कोर्टाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

बुधवारी पटियाला हाऊस कोर्टात मलिकला किती शिक्षा होणार यावर चर्चा झाली. या प्रकरणी एनआयएने यासिनला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संध्याकाळी ६ नंतर कोर्टाने निर्णय दिला. १९ मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान यासीनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. निकालापूर्वी श्रीनगरमधील काही भागांची नाकेबंदी करण्यात आली आहे.

दरम्यान, श्रीनगरच्या मैसुमा भागात यासीन मलिक समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यासीनच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. खबरदारी म्हणून सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा केला. याआधी पोलिसांनी यासीनच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. येथे ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. यासीन मलिकच्या घराबाहेर ही दगडफेक आणि निदर्शने करण्यात येत आहेत.

‘मला आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना सामोरे जायचे नाही’’, असे मलिक याने न्यायालयाला यापूर्वी सांगितले होते. मलिक सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. २०१७ च्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात कलम १२०-ब गुन्हेगारी कट, कलम १२४-अ देशद्रोहचे आरोप मलिकवर लावण्यात आले.

दहशतवादी बुरहानी चकमकीत ठार झाल्यानंतर २०१६-२०१७ मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली. यानंतर तपास यंत्रणा एनआयएने यासीन मलिक आणि अन्य फुटीरतावाद्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून, कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान मलिकने सर्व आरोपांची कबुली दिली.

लाल चौकात मोठा फौजफाटा तैनात

श्रीनगरमधील लाल चौकातील काहीसह मैसुमा आणि लगतच्या भागातील बहुतांश दुकाने बंद राहिली. वाहतूक सुरळीत असली तरी जुन्या शहरातील काही भागातील बाजारपेठाही बंद होत्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

मलिकचा आरोपांना आव्हान देण्यास नकार

दोषी ठरल्यानंतर, मलिकने न्यायालयाला सांगितले की तो UAPA कलम १६ (दहशतवादी क्रियाकलाप), १७ (दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे), १८ (दहशतवादी कृत्यांचा कट) आणि २० (दहशतवादी गट किंवा संघटनेचा सदस्य) दोषी आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी (गुन्हेगारी कट) आणि १२४-ए (देशद्रोह) अंतर्गत त्याच्यावरील आरोपांना तो आव्हान देऊ इच्छित नाही. मलिक २०१९ पासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे.

Back to top button