Sara Tendulkar : अर्जुनला संधी न मिळाल्याने बहिण सारा तेंडुलकर भडकली, पोस्ट केला ‘हा’ व्हिडिओ! | पुढारी

Sara Tendulkar : अर्जुनला संधी न मिळाल्याने बहिण सारा तेंडुलकर भडकली, पोस्ट केला ‘हा’ व्हिडिओ!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sara Tendulkar : मुंबई इंडियन्सने शनिवारी (२१ मे) वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध विजय मिळवून आयपीएल २०२२ मधील हंगामाचा शेवट विजयाची चव चाखत केला. मुंबईने या हंगामात आपल्या संघातील २२ खेळाडूंना संधी दिली, मात्र तीन खेळाडू असे होते ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या तीन खेळाडूंपैकी एक महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) देखील होता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटर झाला आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. अर्जुनचे क्रिकेटवरील प्रेम हे सचिनच्या जेंटलमन्स खेळासारखे आहे. मात्र, या स्टार किडला अद्याप आयपीएलमध्ये एकाही सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने त्याला गेल्या दोन वर्षांपासून डेब्यू करण्याची संधीच दिली नाही. यंदा आयपीएलच्या १५ व्या हंगामात अर्जुनला खेळायला मिळेल अशी सगळ्यांना खात्री होती. मात्र, तो या संधीपासून वंचितच राहिला. तसेच मुंबई इंडियन्स संघाचाही प्रवास लिगमध्ये संपुष्टात आला.

गेल्या वर्षीही मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेल्या अर्जुनला मुंबईने यंदाच्या मेगा लिलावात ३० लाख रुपयांना विकत घेतले. मात्र त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. शेवटच्या साखळी सामन्यात जिथे मुंबईकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, तिथे अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळेल, अशी आशा चाहत्यांना वाटत होती, पण तसे काही झाले नाही.

अर्जुन तेंडुलकरला संधी न मिळाल्याने बहिण सारा (Sara Tendulkar) निराश

शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्या संघात काही बदल केले होते, मात्र कर्णधार रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरचा संघात समावेश केला नव्हता. यानंतर हा डावखुरा वेगवान गोलंदाज सीमारेषेवरूनच खेळाडूंना मदत करताना दिसला.

दरम्यान, दिल्ली विरुद्धच्या सामन्यादरम्यान अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती आणि तिने सामन्यादरम्यान एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचा भाऊ अर्जुन आयपीएल २०२२ मध्ये एकही सामना खेळू शकला नाही हे पाहून ती देखील निराश झाली असावी. यानंतर तिने अर्जुन तेंडुलकरचा व्हिडिओ बनवला आणि तो ‘गली बॉय’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘अपना टाइम आएगा’ गाण्यासोबत पोस्ट केला.

मुंबई इंडियन्सने शेवटच्या सामन्यात विजय मिळवून दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेऑफच्या आशा धुळीस मिळवल्या. त्यामुळे पराभूत दिल्लीचा संघ लीगमधून बाद झाला. तथापि, मुंबईचा विजय रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या खेळाडूंनी मोठ्या उत्साहात साजरा केला, कारण दिल्लीने सामना गमावल्याने आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला.

मुंबई इंडियन्स संघ म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ. तब्बल ५ वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावलेल्या मुंबई संघाला यंदा मात्र काहीच खास कामगिरी करता आलेली नाही. मुंबईचा संघ यंदा १४ पैकी तब्बल १० सामने गमावत दहाव्या स्थानावर राहिला. त्यामुळे आयपीएलचा १५ हंगाम मुंबईसाठी सर्वात वाईट ठरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

Back to top button