

परभणी; पुढारी वृत्तसेवा : होमगार्डची नोकरी सांभाळत त्या गाण्याचा छंद जोपासत हाेत्या. मात्र नियतीच्या मनात वेगळंच हाेतं. लग्न समारंभात त्यांच्या सुरेल आवाजाने उपस्थित मंत्रमुग्ध हाेत असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याचा जागीच मृत्यू झाला. संगीता गव्हाणे (वय 48) असे काळाने घाला घातलेल्या गायिकेचे नाव असून, विवाह समारंभातील त्यांच्या आकस्मिक एक्झिटने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. संगीता यांचा गाणे गात असलेल्या अखेरच्या काही क्षणांचा व्हिडीओ व्हायरल हाेत आहे.
संगीता गव्हाणे यांचे पती पोलिस दलामध्ये जमादार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. जिल्हा होमगार्ड दलात कार्यरत असलेल्या संगीता आपला गायनाचा छंद जोपासण्यासाठी बँड पथकात गात होत्या. शनिवारी (दि.20) पाथरी रस्त्यावरील मंगल कार्यालयात लग्नसमारंभ होता. यावेळी मिरवणुकीत असलेल्या बँड पथकात संगीता गात होत्या. याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या जागीच कोसळल्या. त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचलंत का ?