औरंगाबाद : तर मनगटातील ताकद दाखवावी लागेल : राज ठाकरे | पुढारी

औरंगाबाद : तर मनगटातील ताकद दाखवावी लागेल : राज ठाकरे

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात मला कुठेही दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छाही नाही. परंतु मशिदींवरील भोंगे उतरविले गेलेच पाहिजेत. 3 मे रोजी ईद आहे. त्यानंतर मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास चार मे (बुधवार)पासून मशिदींच्या समोर दुप्पट आवाजात हनुमानचालिसा ऐकवली जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी येथे दिला.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली राज ठाकरे यांची बहुचर्चित सभा येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली. सभेसाठी राज्यभरातून मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या सभेत राज ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच मशिदीतून अजान ऐकू आली. सभा सुरू असतानाच बांग कशी ऐकू येते, असा प्रश्न उपस्थित करून, औरंगाबादच्या पोलिसांनी त्यांच्या तोंडात बोळे कोंबून हा आवाज तातडीने बंद करावा. त्यानंतरही समजत नसेल तर एकदाचे होऊनच जाऊ द्या. महाराष्ट्राच्या मनगटातील ताकद त्यांना दाखवावीच लागेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

तीन मे रोजी ईद आहे. मुस्लिमांच्या सणात मला विष कालवायचे नाही. मात्र, चार मे पासून आम्ही कोणाचे ऐकणार नाही. या तारखेनंतर मशिदींवरील भोंगे लागल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमानचालिसा ऐकवा, असे आदेश त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. भोंगे हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. मुस्लिमांनीदेखील ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. उत्तर प्रदेशात भोंगे उतरविले जात असतील, तर महाराष्ट्रात तसे का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रस्त्यावर नमाज पढण्याच्या कृतीवर त्यांनी हल्ला चढविला. रस्त्यावर नमाज पढण्याचा अधिकार मुस्लिमांना कोणी दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा

 

Back to top button