चारशे चाळीस व्होल्टस्चा धक्का

चारशे चाळीस व्होल्टस्चा धक्का
Published on
Updated on

का हो? पेपर वाचताना एवढे गंभीर का झालात?
आकड्याचा मोह फारच वाढतोय बरं.
आकडा? कुठला आकडा? माझ्याकडे बघून का बोलताय? मी नाय बा त्यातला.
अमुक एक आकडा असं म्हणत नाहीये मी.. आकडा लावण्याच्या मोहाबद्दल म्हणतोय. माणसांनी असे फटाफट आकडे लावले नसते ना, तर बरेच प्रश्च कमी झाले असते.

खरंच. ह्या सट्टेबाजीने, जुगाराने किती माणसं आयुष्यातून उठतात, नाही? तरी सारख्या धाडी टाकून आकडेबहाद्दरांना पकडलं जात असतंच अधूनमधून.
तो आकडा वेगळा, मी म्हणतो तो वेगळा. मला आकडा टाकून वीज पळवणार्‍यांबद्दल जास्त काळजी वाटते.
हो, येत असतं बुवा त्याबद्दल पेपरात काहीबाही. मी म्हणतो, एवढी हुशारी कशी काय जमते लोकांना? नुसती सुटी सुटी दिवाबत्ती, ग्लोब वगैरे चोरणं एकवेळ जमेल. पण डायरेक वीजच चोरायची म्हणजे मोठा कुटाणा असणार त्यामागे.
छे छे! ते काम माहितगारांसाठी फार कठीण नाही. खांबावरची, इन्सुलेशन नसलेली, विजेची वायर शोधायची आणि तिला तांब्याचा हूक गुपचूप द्यायचा अडकवून. की गरजेप्रमाणे केबल बिबल टाकून वीज फुकटात घ्यायला आपण मोकळे. मीटर नाही, बिल नाही, काही नाही.

आयडियाची कल्पना भारी आहे की. म्हणजे मग आपण उगाचच विजेची बिलं भरतो असं म्हणायचंं की काय?
असं कसं? वीज मंडळाला पडायचा तो भुर्दंड पडतोच. वीज संपायची तेवढी संपतेच. फक्त वापरणार्‍याला फुकटात मिळते. आपला नाक्यावरचा इस्त्रीवाला असंच करतोय का? मी केव्हाचा डाऊट खाऊन आहे त्याच्यावर.
असेल किंवा नसेलही. पण नुसता तो एकटा नसतो अशा उद्योगात. शेतीसाठी, पाण्याच्या पंपासाठी, वेल्डिंग वगैरेच्या कामांसाठी,

बांधकामासाठी, राज्यभर हे चालूच असतं. बाबो, विजेबाबतचं हे असलं जुगाड झटका देणारं आहे.
झटका म्हणजे? साधासुधा नाही. चारशे चाळीस व्होल्टस्चा. तिकडे वीज मंडळ तोट्यात, इकडे हवी त्यांना पुरेशा दाबाने वीज नाही, मुळात पुरेशी वीजच नाही, असं कसं चालावं?
म्हणून आकड्याबाबत इशारा देत होता होय तुम्ही? मला आपलं वाटलं, तीन पत्तीपासून बॉम्बे बाजार ते पार हळद वायद्यापर्यंतचे आकडे की काय?

नाही हौ. जुगार म्हटला की तो केव्हाही वाईटच. शंकाच नाही. म्हणून तर खुला सट्टा, जुगार ह्यावर बंदी येते ना?
प्रश्नच नाही. पण खेळातले छोटे मोठे आकडे लावल्यामुळे त्या त्या माणसाचे पैसे जातात, व्यसनं लागतात, निराशा येते. एवढंच जातं म्हटलं तर. विजेचे आकडे लावणारे मात्र स्वतःबरोबर सर्वांचंच नुकसान करत जातात. आकड्याचा मोह सुटेल तो सुदिन.

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news