भंडारा : भर सभेत दारूच्या नशेत ग्रामसेवक खुर्चीतच लोळले; सभा करण्याची आली वेळ | पुढारी

भंडारा : भर सभेत दारूच्या नशेत ग्रामसेवक खुर्चीतच लोळले; सभा करण्याची आली वेळ

भंडारा; पुढारी वृत्‍तसेवा : ग्रामपंचायतीच्या नियोजित सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत खुर्चीवरच लोळल्याचा धक्कादायक प्रकार साकोली तालुक्यातील विरसी ग्रामपंचायतीमध्ये (सोमवार) घडला. सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत बेशुद्ध झाल्याने नियोजित सभा होऊ शकली नाही. या प्रकाराची तक्रार पोलिसांसह वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.

साकोलीपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत विरशी येथे (सोमवार) ११ वाजता सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक हेमंत पब्बेवार चक्क दारू पिऊन आले. ते दारुच्या नशेत इतके तर्र होते की खुर्चीवर बसल्याबसल्या लोळू लागले. त्यातच ते बेशुद्ध झाले. ग्रामपंचायतीच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते उठूही शकत नव्हते. परिणामी, पदाधिकाऱ्यांची सभा होऊ शकली नाही. त्यामुळे सभा रद्द करावी लागली.

त्यानंतर सर्व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी आणि पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना भेटून घटनेची माहिती दिली. घटनेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. सरपंच लीलाधर सोनवाणे, उपसरपंच नंदलाल राऊत, सदस्य रजनी दुर्गेश राऊत, माधुरी रेशीम लांजेवार, सरिता गहाने, पफुलता कोटांगले, वर्षा कापगते, भगवान लांजेवार, बाबुदास पंधरे यांनी लेखी स्वरूपाची तक्रार वरिष्ठांना दिली आहे. या सर्व घटनेचे छायाचित्र खुद्द उपस्थित पदाधिकाऱ्यांनी काढले. दारुड्या ग्रामसेवकाची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button