पुणे : पुढारी वृत्तसेवा : उष्णतेच्या लाटेमुळे (heat stroke) नागरिक होरपळून निघत असून, नागरिकांनी उन्हात निघताना काळजी घेतली पाहिजे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम असेल, तरच उन्हात बाहेर पडावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केल्या आहेत.
राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता अधिक असून, उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांनी पाणी सोबत घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. प्रत्येकाला शारीरिक वजनाप्रमाणे पाण्याची गरज भासते. २० किलो वजनामागे एक लिटर, तर प्रत्येकाने किमान ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीराला योग्य पाणी न मिळाल्यास डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा त्रास टाळण्यासाठी लिंबूपाणी, नारळपाणी, ताक यांसारखे थंडपेय घ्यावे. टरबूज, खरबूज, काकडी, संत्रा अशा फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, अशी फळे प्राधान्याने खावीत. 'ओआरएस'ची पुडी सतत सोबत ठेवावी, उन्हात फिरताना किमान तीन ते चारवेळा प्यावी, कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा उन्हे कमी झाल्यानंतर करावीत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
शरारीतील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास उष्माघाताची (डिहायड्रेशन) शक्यता असते. शरीरास घाम सुटणे, तहान लागणे व त्वचा कोरडी होणे, थकवा, ताप येणे, त्वचा कोरडी होऊन त्यामधून रक्त येणे, त्वचेवर पुरळ उठणे तसेच लघवीचा रंग पिवळा होणे, पाणी प्यायल्यानंतर लगेच तहान लागणे, भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे ही उष्माघाताची (heat stroke) लक्षणे आहेत.
उन्हाळा हा आरोग्याची कसोटी घेणारा असतो. या वर्षी तो अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हात निघणे टाळावे व सर्वांनी सकाळी लवकर कामे उरकून घ्यावीत. बाहेर पडताना पाणी सोबत ठेवावे व वारंवार प्यावे. कोणतीही धोकादायक लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा व उष्माघात टाळावा.
– डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. पुणे.
हेही वाचलंत का ?