बीड : मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन नाचल्यानंतर आला हृदयविकाराचा झटका, तरुणाचा मृत्यू | पुढारी

बीड : मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन नाचल्यानंतर आला हृदयविकाराचा झटका, तरुणाचा मृत्यू

बीड; पुढारी वृत्तसेवा : माजलगाव (दि.२८) येथे आपल्या मित्राच्या लग्नातील मिरवणुकीत वाद्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचलेल्या तरुणाला हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला. दरम्यान, या धक्क्यात त्याचा मृत्यू झाला. वैभव रामभाऊ राऊत (वय २५ वर्ष) असे या तरूणाचे नाव आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथे रविवारी रात्री घडली.

रविवारी सायंकाळी शिंदेवाडी या गावात माने-कोळसे शुभविवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात नवरा नवरी दोघेही शिंदे वाडी गावातील रहिवासी होते. लग्नातील नवरदेव अक्षय माने याच्या विवाह असल्याने त्याचे माजलगाव येथील मित्र लग्नास आले होते, त्यात वैभव रामभाऊ राऊत हादेखील होता. सायंकाळी सहा- साडेसहाच्या सुमारास लग्नापूर्वी देवदर्शनासाठी नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीवेळी सुरू असलेल्या वाद्यांच्या तालावर सर्व तरुण मंडळी बेधुंद नाचत होती. अगोदरच दिवसभर असलेला उन्हाचा पारा व त्यातच बेधुंद नाचणे बराच वेळ सुरू होते. मिरवणूक लग्नस्थळी येताच तेथे वैभव राऊत मित्रांसह खुर्चीवर बसला. तहानेने व्याकूळ झालेल्या वैभवने एका दमात पाणी पिले. यादरम्यान त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे उपस्थित सर्व लोकांमध्ये गोंधळ उडाला.

या घटनेनंतर त्याला माजलगाव येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, या घटनेने गावावर शोककळा पसरली.

हेही वाचा

Back to top button