बीड : अवघ्या ६ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून फेकले | पुढारी

बीड : अवघ्या ६ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून फेकले

बीड, पुढारी वृत्तसेवा : सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका २० वर्षीय विवाहितेला तिसर्‍या मजल्यावरून फेकून तिचा खून केला. ही धक्कादायक घटना बीड शहरातील शाहूनगर भागात गुरुवारी सकाळी ७ वाजता घडली. या प्रकरणी पती, दीर व जावूविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पती शेख शकुर यास ताब्यात घेतल्याचे समजते.

यास्मीन शकूर शेख ( वय २०, रा. शाहूनगर , बीड ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मृत विवाहितेचे वडील रहीम शरिफोद्दिन शेख ( रा . इस्लामपुरा, पेठ बीड ) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी यास्मीनचा विवाह शकूर बशीर शेख (वय २९) याच्याशी झाला होता . शकूर हा मिस्त्रीकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यास्मीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी (दि. २४) सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी तिच्या माहेरच्या लोकांना दिला.

त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. त्यानंतर यास्मीनला तिसर्‍या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जावू सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : कशी घेऊयात कानाची काळजी | how to Care for your Ears Properly

Back to top button