अर्थसंकल्प २०२२ : "या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलंय" | पुढारी

अर्थसंकल्प २०२२ : "या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलंय"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “अर्थसंकल्पाला कोणतीही दिशा नाही. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई कधी मिळणार? शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही. अवर्षण, अतिवृष्टी, चक्रीवादळ यामध्ये कुठलीही मदत शेतकऱ्याला मिळालेली नाही. पिकविम्याची मदत शेतकऱ्याला मिळालेली नाही. राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरचा कर कमी केला नाही”, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी ठाकरे सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केलेले आहे.

राज्य अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थसंकल्प २०२२-२३ सदनात मांडला. त्यावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, “कळसुत्री सरकारनं विकासाचं पंचसुत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे. या पंचसुत्रीने काहीही होणार नाही. कारण, या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलेले आहे. आणि दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, बारा-बलुतेदार सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेले आहे”, अशी टीका फडणवीस यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर केलेली आहे.

“आजचा अर्थसंकल्प कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासा चालना देऊ शकत नाही. विशेषत: मागील अर्थसंकल्पातील घोषणा पुन्हा या अर्थसंकल्पात करायच्या. चालू कामांच्याच घोषणा या अर्थसंकल्पात करायच्या. आमच्या सरकारच्या काळात सुरू असलेल्या योजनाच पुन्हा या अर्थसंकल्पात करायच्या. तरीही मला एका गोष्टीचा आनंद आहे की, पहिल्याच वर्षांच आम्ही सुरू केलेल्या घोषणा पुन्हा सुरू ठेवून त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न हे सरकार करते आहे”, अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.

हे वाचलत का? 

Back to top button