हिंगोली : सेनगाव-हिंगोली महामार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग | पुढारी

हिंगोली : सेनगाव-हिंगोली महामार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग

सेनगाव; पुढारी वृत्‍तसेवा : हिंगोली महामार्गावर चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

परळी जिल्ह्यातील टोकवाडी येथून बांधकामासाठी लागणारी वीट घेऊन दहा चाकी ट्रक सेनगावकडे येत होता. परंतु रेडीयेटरमधले पाणी संपल्यामुळे उष्णता निर्माण होऊन सेनगाव जवळ येताच अचानक चालत्या ट्रकला भीषण आग लागली. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

सेनगाव – हिंगोली महामार्गावर ही घटना घडली असून, एम.एच.२६ एच.५९६४ या क्रमांकाच्या ट्रकचे जळून नुकसान झाले आहे. तर बालाजी शंकर चाटे असे ट्रक चालकाचे नाव आहे. या ट्रकमध्ये सात मजूर देखील होते. अचानक आग लागल्याने चालकासह मजुरांनी आपला जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून उड्या घेतल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु या आगीत ट्रकचे समोरील दोन्ही टायर जळून खाक झाले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

सेनगावचे उपनगराध्याक्ष संदिप देशमुख यांनी ताबडतोब नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला फोन करुण तात्काळ अग्निशमनदलाची गाडी बोलावली. नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. यावेळी सेनगाव – हिंगोली महामार्गावरील दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी सेनगाव येथील पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.

Back to top button