गोवा : कार्निव्हलला राजधानीतून आजपासून प्रारंभ | पुढारी

गोवा : कार्निव्हलला राजधानीतून आजपासून प्रारंभ

पणजी; पुढारी वृत्तसेवा: राज्यात प्रसिद्ध अशा कार्निव्हलला शनिवारपासून (दि.26) सुरुवात होत आहे. राजधानी पणजीत कार्निव्हलची तयारी महापालिकेने जोरदार केली आहे. भाऊसाहेब बांदोडकर मार्ग कार्निव्हलच्या परेडसाठी सजला आहे. त्याचबरोबर चार दिवस चालणार्‍या सांगितिक कार्यक्रमासाठी सांबा स्क्वेअरही सजला आहे. ‘खा, प्या, मजा करा’, असा संदेश देणार्‍या किंगमोमोची राजवट राजधानीतून सुरू होऊन ती वास्को, मडगाव व म्हापसा अशा चार प्रमुख शहरात राहील.

पर्यटन खात्याने स्थानिक नगरपालिकांच्या सहकार्याने या चार शहरातील या परेडचे आयोजन केले आहे. पणजीतून कार्निव्हल परेडची सुरुवात दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. त्यानंतर 27 रोजी मडगाव, 28 रोजी वास्को आणि 1 मार्च रोजी म्हापसा येथे कार्निव्हल परेड होणार आहे.

पणजीतील कार्निव्हलसाठी बॉलिवूड अभिनेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेने निमंत्रित केले आहे. त्याशिवाय कचरामुक्‍त कार्निव्हल करण्याचा महापालिकेने उपक्रमही राबविला आहे. परेड होणार्‍या मार्गावर कचरा होऊ नये, म्हणून उपस्थित राहणार्‍या नागरिकांमुळे होणारा कचरा संकलित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी सीएएम इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस ही कंपनी कार्निव्हल मार्गावर मल्टीवे सेग्रीगेशन स्टेशन स्थापन करणार आहे.

नियमांचे पालन करूनच कार्निव्हल

कोविडची राज्यातील सध्यस्थिती पाहता त्यासाठी लागू केलेल्या नियमावलींचे पालन, तसेच विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या आचारसंहितेचे नियम पाळूनच कार्निव्हलचे आयोजन करण्यात येईल, असेही पर्यटन खात्याने ठरविले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button