नांदेड : कचरा घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे | पुढारी

नांदेड : कचरा घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

उमरखेड, पुढारी वृत्तसेवाः येथील नगर परिषदेत झालेल्या कचरा संकलन व विल्हेवाटीच्या कामातील तब्बल ६५ लाखांच्या घोटाळ्याचा तपास आता उमरखेड पोलिसांकडून काढून घेत आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. तपासाला गती देत गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. ११) रोजी सकाळी उमरखेड येथे दाखल होत पालिकेत दिवसभर तळ ठोकला. यादरम्यान पथकाने अकाउंट्स घोटाळ्यातील दस्तावेजांची पडताळणी केली.

कचरा संकलनाच्या ६५ लाखांच्या घोटाळ्यात माजी नगराध्यक्ष तथा आमदार नामदेव ससाने, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव, लेखापाल सुभाष भुते, स्थायी समिती सदस्य, माजी नगराध्यक्ष, चंद्रशेखर जयस्वाल, दिलीप सुरते, अमोल तिवरंगकर, सविता पाचकोरे, कंत्राटदार  फिरोज खान (मॅकनिक), गजानन मोहाळे व मजूर पुरवठादार पल्लवी कन्स्ट्रक्शन नांदेडच्या संचालक आदींवर गुन्हे दाखल झाले आहेत.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त भारत इंगुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादवि. ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हे उमरखेड पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. आर्थिक घोटाळ्याची  व्याप्ती मोठी असलेल्या या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ, दिलीप पाटील भुजबळ यांनी हा तपास उमरखेड पोलिसांकडून काढून घेत आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे सोपविला आहे.

अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ, खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वातील आर्थिक गुन्हे शाखेचे पथक हा तपास करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी उमरखेड येथे पोहोचले. त्यानंतर ठाणेदार अमोल माळवे आणि तपास अधिकारी एपीआय सुजाता बनसोड यांच्याकडून आत्तापर्यंत झालेल्या तपासाचे दस्तावेज ताब्यात घेवून माहिती घेतली.

यानंतर नगरपालिकेचे कार्यालयात जावून तेथील अधिकाऱ्यांकडून कलम ५८ (२) अन्वय घेतलेल्या ठरावाच्या प्रती, अकाउंट, वाउचर आणि घोटाळ्याशी संबंधित महत्वपूर्ण दस्तऐवजाची पडताळणी केली. शिवाय काही दस्तऐवजांच्या प्रतीही ताब्यात घेतल्या.

हेही वाचलंत का?

Back to top button