

काष्टी, पुढारी वृत्तसेवा
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौंड रोडवरील महामार्गावर कार आणि ट्रॕक्टरच्या धडकेत आर.पी.एफचे जवान बाबासाहेब सूर्यभान कारंडे ( रा. दरेवाडी ता. नगर) हे जागीच ठार झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील काष्टी नगर-दौंड रोडवरील महामार्गावर शिवशक्ती दूध डेअरीजवळ आज पहाटे बाबासाहेब कारंडे कारने ( एम. एच. १६ बी. एच. ३८५८ ) जात हाेते. यावेळी कारची ट्रॕक्टरला पाठीमागून जोराची धडक बसली. यामध्ये जवान कारंडे यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर ट्रॕक्टर चालक ट्रॉली जागेवर सोडून ट्रॕक्टर घेऊन पळून गेला. या ट्रॕक्टरला रिफ्लेक्टर नसल्यामुळे चालकाला पुढील वाहन दिसले नाही म्हणून हा अपघात झाल्याची चर्चा आहे. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारची पुढील बाजू पूर्णतः चक्काचूर झाला हाेता. अपघातानंतर कारंडे यांना वेळेवर मदत मिळाली नाही. सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी हा अपघात पाहिल्यानंतर त्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना दिली.
कारंडे हे राष्ट्रीय सायकलपट्टू खेळाडू ओम कारंडे यांचे वडील होत. श्रीगोंदा पोलिसांत या अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले करीत आहे.
पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली?
श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी, तालुक्यातील प्रत्येक साखर कारखान्यावर जावून कारखाना पदाधिकारी व ऊस वाहतूकदार यांची बैठक घेतली होती. त्यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाने आपल्या वाहनाला रेडीअम, रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. अनेकांनी याची दखल घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे पोलिसांच्या आदेशाला वाहन चालकांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येते आहे.
हेही वाचा