काँग्रेसने गोव्यातील विकासकामांचा हिशोब द्यावा : अमित शहा यांचे आव्हान | पुढारी

काँग्रेसने गोव्यातील विकासकामांचा हिशोब द्यावा : अमित शहा यांचे आव्हान

पणजी, पुढारी वृत्तसेवा

केंद्रात काँग्रेस सरकार आणि राज्यात दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना २०१३-१४मध्ये केंद्राने ४३२ कोटी रुपये दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील अर्थसंकल्पात ४३२ कोटींवरून २ हजार ५६७ कोटींवर दिले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी समोरासमोर सर्व हिशोब घेऊन यावे. आपणही हिशोब घेऊन आलो आहोत, असे आव्हान केंद्रीय गृहराज्य मंत्री अमित शहा यांनी आज  दिले. केवळ भाजपच स्थिर सरकार देऊ शकते, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.  फोंडा येथील सन ग्रेस गार्डनमध्ये भाजपचे उमेदवार रवी नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे यांची उपस्थिती होती. यावेळी शहा म्‍हणाले, देशाच्या नकाशात छोटासा दिसणारा गोवा देशाचे सौंदर्य आहे. त्याला अधिक सुंदर बनविण्यासाठी भाजपने सुरुवात केली आहे. राज्याचा विकास, सुरक्षा, पर्यटन विकास, गोव्यातील युवकांना रोजगार यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच देऊ शकते.

आम्ही गोव्याला सुवर्ण गोवा बनवायचा आहे, काँग्रेससाठी गोवा हा केवळ गांधी परिवाराच्या पर्यटनासाठी हवा आहे. काँग्रेसचे नेते बरेच पर्यटन करीत असतात, त्यासाठीच त्यांना पर्यटनस्थळ हवे आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने सुवर्ण गोवा हवा की गांधी परिवाराचा गोवा हवा, हे सांगावे असे आवाहन शहा यांनी केले.

राहुल गांधी यांच्यावर टीकास्र

राज्यात विविध पक्ष निवडणूक लढविण्यासाठी आले आहेत. कोणा पक्षाला राज्यात खाते खोलायचे आहे, राज्यात केवळ भाजपचेच सरकार बनू शकते, त्यासाठी जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे. राहुल गांधी देश चालवू शकत नाहीत. त्यांना केवळ मोदी फोबिया झाला आहे. जिथेतिथे मोदी मोदी करत असतात. केवळ नकारात्मक ट्विट करत असतात, असेही शहा यांनी सांगितले.

छोटे छोटे पक्ष सरकार बनवू शकत नाहीत

राज्यातील निवडणुकीत तृणमूल काँग्रेस, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, मगोप, शिवसेना यांच्यासारखे लहानलहान पक्ष उड्या मारत आहेत. मात्र, यांच्यात स्थिरता व सातत्यपूर्ण नीती नाही. या पक्षांना स्वतःला राष्ट्रीय स्तरावरील पक्ष बनायचे आहे, तर काहींना केवळ आपले खाते उघडायचे आहे. ते इथे सरकार बनवू शकत नाहीत, असाही टोला शहा यांनी लगावला.

कामत यांचे सरकार ए-थ्री चे सरकार

भाजपमुळेच राज्यात स्थिरता आली आहे. अन्यथा दिगंबर कामत यांच्या सरकारच्या काळात अव्यवस्था, अस्थिरता, अराजकता म्हणजेच ए-3 सरकार होते. मागील दहा वर्षांत भाजपने विकासाच्या एका नव्या युगाची सुरुवात केल्याचे शहा यांनी नमूद केले.

हेही वाचा

Back to top button