उमरखेडच्या युवा अभियंता मेट्रोलॉजीच्या माध्यमातून सातासमुद्रापार भरारी | पुढारी

उमरखेडच्या युवा अभियंता मेट्रोलॉजीच्या माध्यमातून सातासमुद्रापार भरारी

उमरखेड, पुढारी वृत्तसेवा : जागतिकीकरणाच्या युगाने औद्योगिक उद्योगासाठी नवनवी आव्हाने, त्याच बरोबर नवनव्या संधी उपलब्ध केल्या आहेत. ज्यांनी ही आव्हाने पेलून, मिळालेल्या संधीचे सोने केले ते  यशोशिखर गाठतात. अशाच यशाच्या शिखरावर पोहचून उमरखेड येथील सामान्य कुटुंबातील मधुकर आप्पाराव जाधव या युवा अभियंत्याने समाजात आदर्श निर्माण केला आहे.

मधुकर जाधव मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मधील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण तामसा तर महाविद्यालय शिक्षण उमरखेड येथे झाले. अभियांत्रीकी पदवीका पुसद येथे पूर्ण झाली. वडील शिक्षक असल्याने त्यांचा शिक्षणाकडे अगदी कटाक्षाने ओढा होता.

त्यांनी अभियांत्रीकी पदवी घेतली आणि सुरूवातीला पुण्यातील अग्रगण्य कंपनीत १० वर्ष काम केले नंतर आपल्या कौशल्याच्या जोरावर पुण्याच्या टाटा एरोस्पेस मध्ये नोकरी मिळवली तेथे ६ वर्ष नोकरी केली. आणि आपल्या अनुभव आणि कौशल्या मध्ये भर टाकली.

परंतु या नोकरीत त्यांचे मन रमले नाही. मनामध्ये काहीतरी वेगळ करण्याची उमेद होती. ती काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग त्या दिशेने त्यांनी प्रयत्न चालु केले.

टाटा मधील नोकरीला तिलांजली वाहिली

शेवटी त्यांनी टाटा एरोस्पेस मधील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला तिलांजली दिली. स्वतःच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी सन २०१७  साली ला भोसरी, पुणे येथे स्वतःची डेल्टा मेट्रोलॉजिकल प्रायव्हेट कंपनी लिमिटेड ही कंपनी स्थापन केली.

यामध्ये ते विविध अभियांत्रिकी वस्तूचे परीक्षण करतात. ते भारतातील अग्रगण्य कंपनी टाटा एरोस्पेस, गोदरेज एरोस्पेस, फिलिप्स कंपनींना त्यांची सेवा देत आहेत.

आता त्यांच्या या सेवेची मागणी जागतिक स्तरातून होत आहे. नुकतेच शारजहा दुबई येथील मदरसन लिमिटेड कंपनी, इंग्लंड मधील ए. पी. पी. एच. लिमिटेड कंपनी, अक्ट्स होल्डिंग लिमिटेड कंपनी टर्की, डेल्टा एअरलाइन्स कंपनी सिंगापूर व डासाल्ट ऍव्हीशन कंपनी, फ्रान्स या कंपनीने त्यांना त्यांच्या उत्पादनाचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केले आहे.

त्यांच्याकडे विविध अभियांत्रिकी वस्तुचे परिक्षण करण्यासाठी असणाऱ्या सी.एम.एम (मेड इन अमेरिका), ब्लु लाईट स्कॅनिंग (मेड इन जर्मनी), पोर्टेबल आर्म (मेड इन सिंगापूर), व्हिजन मेजरिंग (मेड इन इंडिया) जवळपास सर्व मशिन्स ह्या फॉरेन येथुन आयात करण्यात आलेल्या आहेत.

लॉकडाऊन नंतर हार मानली नाही

मागील वर्षी कोरोना जागतिक महामारी चा सर्वात मोठा फटका उद्योगजगताला बसला. तरी त्यांनी त्यात हार मानली नाही. लॉकडाऊन नंतर आलेल्या बिकट परिस्थितीत हार न मानता किंवा खचून न जाता आपला उद्योग कमी जास्त प्रमाणात चालू ठेवला.

कष्ट व कौशल्य या जोरावर त्यांनी आपले  कर्तुत्व सिध्द केले.

त्यांच्या या कार्याचे मित्रमंडळी, आप्तेष्ट व गावकरी मंडळीतर्फे कौतुक होत आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

कोल्हापूर : सह्याद्रीतील अनोख्या हिरव्या बेडकाची गोष्ट : Malabar Gliding Frog of Sahyadri

Back to top button