गोव्यात तृणमूल काँग्रेस म्हणजे दोरा तुटलेला पतंग | पुढारी

गोव्यात तृणमूल काँग्रेस म्हणजे दोरा तुटलेला पतंग

पणजी : अवित बगळे : गोव्यासारख्या चिमुकल्या पण गुंतागुंतीच्या राजकीय अवकाशात तृणमूल काँग्रेसची स्थिती दोर तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे. कुडतरीचे ( जि. दक्षिण गोवा) माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला होतो. ते या नव्या घरात 27 दिवस राहिले.

माजी मंत्री मायकल लोबो यांनी हाक मारताच मित्राला प्रतिसाद देत तृणमूलला टाटा-बायबाय केला. या घटनेमुळे तृणमूल दक्षिण गोव्यातून विधानसभेत खाते उघडेल ही अटकळही फोल ठरली.गोमंतकीय मतदारांची नस ओळखण्यात हा पक्ष प्रारंभापासून सपशेल अपयशी ठरला. या पक्षाची आता अवस्था दिशाहीन झालेली आहे.

विधानसभा निवडणुकीत हा पक्ष भरकटेल हे आणि काही वेगळे सांगण्याची गरज नाही. येईल त्या पक्षामध्ये घाऊकमध्ये प्रवेश देण्याचा सपाटाच लावला आहे. कार्यकर्त्यांचे जाळे नाही, परंतु राज्याच्या कानाकोपर्‍यात प्रचंड जाहिरातबाजी करून कोट्यवधी रुपये उधळण्याचा उद्योग या पक्षातर्फे सुरू आहे.

युती आणि सोसणे
तृणमूल काँग्रेस ने मगो पक्षासोबत युती केली. मात्र त्यातून तृणमूल काँग्रेसला लाभ झालेला नाही. याउलट काँग्रेसशी युती केल्यानंतर मये मतदारसंघातील संभाव्य उमेदवार प्रेमेन्द्र शेट आणि पेडणेतील संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी मगोपची साथ सोडलेली आहे. यामुळे तृणमूल काँग्रेसने सहकारी पक्षाला काय सोसावे लावले हे दिसून येते.

काय बोलायचे ते लिहून देतात

काँग्रेसमधूनच अनेक नेते तृणमूलच्या कळपात पोहोचले आहेत. माजी पोलिस अधिकारी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे माजी आमदार लवू मामलेदार हे ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो यांच्याबरोबर तृणमूलच्या कळपात दाखल झालेले बिनीचे शिलेदार. त्यांनीही तो पक्ष सोडला. लवू मामलेदार यांनी तर या पक्षाच्या नेत्यांवर जाहीरपणे आरोप केले. काय बोलायचे ते या पक्षातर्फे लिहून दिले जाते यांसारखे आरोप त्यांनी केले होते.

भाजपचा तडाखा… मोईत्रांचे मौन

तृणमूल काँग्रेसने फालेरो यांना राज्यसभेवर पाठवले आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष पद दिले तरी त्यांच्याकडे गोव्याच्या राजकारणाचा ताबा मात्र दिलेला नाही. महुआ मोईत्रा या तुलनेने नवख्या खासदाराकडे गोव्याचे प्रभारीपद तृणमूल काँग्रेसने सोपवलेले आहे. त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नसल्याने एखादे वक्तव्य करण्याआधी ते कसे तपासून घ्यावे लागते हे त्यांना माहीत नाही. लोंढा ते वास्को या लोहमार्गाच्या दुपदरीकरणाला तृणमूल काँग्रेस जोरदार विरोध करत असल्याची भूमिका मोईत्रा यांनी पत्रकार परिषदेत घेतली.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर बरेच तोंडसुख घेतले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आताच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्र सरकारमध्ये रेल्वेमंत्री असताना या प्रकल्पाला मंजुरी दिली गेली आणि बॅनर्जी यांनी अर्थसंकल्प सादर करताना या प्रकल्पाचा उल्लेख केला होता, हे दाखवून दिले. यामुळे मोईत्रा यांच्यावर गप्प बसण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नव्हता.

फालेरो बाजूला…मोईत्रांच्या हाती सूत्रे

तृणमूलचा कार्यभार पूर्णतः खासदार खा. महुआ मोईत्रा यांच्याकडे आहे. राज्यातील चेहरा म्हणून ज्या लुईझिन फालेरो यांच्याकडे पाहिले जात होते, त्यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे नसल्याने सर्व निर्णय मोईत्रांच्या सांगण्यावरूनच होतात. त्यामुळेच अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे.

अद्याप तृणमूलने उमेदवार जाहीर केले नाहीत, उमेदवार जाहीर झाल्यानंतर आणखी तडाखे या पक्षाला बसतील, हे स्पष्ट आहे. कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्यासारख्या बड्या नेत्याने तृणमूल काँग्रेसची 27 दिवसांतच साथ सोडली. रेजिनाल्ड तृणमूलच्या दक्षिण गोव्यात तृणमूल खाते खोलणार, असा अंदाज होता, तो आता धुळीला मिळाला.

Back to top button