

Maharashtra Local Body Election 2025: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा काउंटडाउन सुरू झाला आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असून, याच परिषदेत महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद होणार आहे. निवडणूक तारखांची घोषणा होताच राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका तीन टप्प्यांत पार पडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
पहिला टप्पा: 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती
दुसरा टप्पा: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या
तिसरा टप्पा: 29 महापालिका
पहिल्या टप्प्यातील मतदान नोव्हेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 21 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर आता वेळेचा दबाव वाढला आहे आणि त्यामुळे आजच निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यात सध्या 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत समित्या आणि 246 नगरपालिका अशा एकूण 685 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व संस्थांचा कार्यकाळ संपला असून, राज्यातील स्थानिक प्रशासन तात्पुरत्या प्रशासकांच्या हाती आहे.
निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापणार हे निश्चित आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), शिवसेना (उद्धव ठाकरे आणि शिंदे गट), मनसे आणि महाविकास आघाडीचे पक्ष मोर्चेबांधणीच्या अंतिम टप्प्यात आहेत.
अलीकडेच मतदार याद्यांतील त्रुटींवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मनसे आणि महाविकास आघाडीने तर संयुक्त मोर्चा काढून पुरावेही सादर केले होते. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यावर विरोधक कोणती भूमिका घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.