

CM Fadnavis Slams Slow Pace of Development Works: राज्यातील विकास प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्याने नाराज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या ‘वॉर रूम’ बैठकीत अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर संताप व्यक्त केला. “जगात इतक्या धिम्या गतीने कुठेच काम होत नाही. पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करा,” असा इशारा त्यांनी दिला.
राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वॉर रूम’ बैठक झाली. या वेळी प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगती, निधीचा वापर आणि उर्वरित कामांचा तपशील सादर करण्यात आला. “प्रत्येक प्रकल्पासाठी ठराविक ‘डेडलाईन’ ठरवा आणि त्या मुदतीतच काम पूर्ण करा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
ते म्हणाले की, वॉर रूमने दर तीन महिन्यांनी प्रत्येक प्रकल्पाचा प्रगती अहवाल तपासावा आणि विलंब होणाऱ्या प्रकल्पांवर तत्काळ निर्णय घ्यावा.
राज्यातील सर्व विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून विभागांमध्ये समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला. हे प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत पूर्ण होतील, अशा प्रकारे नियोजन करण्याचे आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा दर 3 महिन्यात घेण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून अधोरेखित करत या कामाला गती देण्याचे आवाहन केले. संबंधित विभाग, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात समन्वय राखून सर्व अडथळे दूर करावेत, नागरिकांना होणारा त्रास कमी करावा आणि प्रकल्प मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे, असे त्यांनी नमूद केले.