

Ladki Bahin Yojana Helpdesk Launched: राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळावा आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात.
दरम्यान, महिलांशी संबंधित काही अडचणी आणि तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी आता विशेष हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे.
आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया (X) वर माहिती देताना सांगितलं की, लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडला, त्यामुळे त्यांचे पैसे काही काळासाठी थांबल्याच्या तक्रारी विभागाकडे आल्या आहेत.
यामुळे अशा तक्रारी आणि इतर शंकांचं तात्काळ निरसन करण्यासाठी 181 या हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या हेल्पलाइनवर फोन करून महिलांना—
e-KYC संदर्भातील अडचणी
लाभ थांबला असल्यास कारण
अर्ज/माहितीतील चुका
योजनेचे हप्ते जमा झाले नाहीत अशा तक्रारी
याबाबत मार्गदर्शन आणि माहिती मिळणार आहे.
मंत्री तटकरे यांनी सांगितलं की, या योजनेसंबंधी कॉल हाताळण्यासाठी संबंधित ऑपरेटर्सना योग्य प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या तक्रारींचे निराकरण अधिक नीट आणि लवकर होईल.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा दरमहा 1500 रुपयांचा हप्ता अनेक महिलांसाठी महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. मात्र काही लाभार्थींना डिसेंबर आणि जानेवारी 2026 चे पैसे मिळाले नाहीत, अशी तक्रार समोर आली होती. यामुळे भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि वाशिम अशा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी महिलांनी रस्त्यावर उतरत नाराजी व्यक्त केल्याचंही पाहायला मिळालं.
आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना विनंती केली आहे की, योजनेशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास 181 हेल्पलाइनचा उपयोग करावा. यामुळे समस्या सोडवण्यासाठी मदत होईल.