

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतीय वस्त्रोद्योगावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्कामुळे देशातील वस्त्रोद्योग निर्यातदारांवर गंभीर संकट ओढवले आहे. मात्र या गंभीर मुद्द्यावर देशाचे पंतप्रधान गप्प बसून आहेत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला. रोजगार गमावणे, कारखाने बंद पडणे आणि निर्यात ऑर्डरमध्ये मोठी घट होत असल्याचेही राहुल गांधींनी नमूद केले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर राहुल गांधी यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर तीव्र शब्दांत टीका करत तिला ‘डेड इकॉनॉमी’ असे संबोधले. वस्त्रोद्योगाशी संबंधित सुमारे ४.५ कोटी रोजगार आणि लाखो छोटे-मोठे उद्योग धोक्यात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. अमेरिकेच्या टॅरिफमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा थेट फटका भारतीय निर्यातदारांना बसत असून सरकारकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गंभीर विषयावर अद्याप मौन बाळगले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योग संकटात असताना सरकारने टॅरिफबाबत ना कोणती ठोस भूमिका मांडली, ना निर्यातदारांसाठी मदत पॅकेज जाहीर केले, नोकऱ्या जात आहेत, कारखाने बंद पडत आहेत आणि निर्यातदारांचे ऑर्डर बुक कमी होत आहेत, तरीही सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन केले.
भारतीय वस्त्रोद्योग हा देशातील रोजगारनिर्मितीचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. हातमाग, पॉवरलूम, लघु व मध्यम उद्योग तसेच निर्यात क्षेत्रातील लाखो कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणांतील बदल आणि केंद्र सरकारच्या कथित उदासीनतेमुळे हे क्षेत्र गंभीर अडचणीत सापडल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.