

LPG Cylinder Gas Level Check: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतावरही होत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून त्याचे पडसाद एलपीजी पुरवठ्यावरही दिसत आहेत.
दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गॅसच्या वाढत्या किमती, हॉटेल-ढाब्यांचे थांबलेले काम आणि काही ठिकाणी चहाच्या टपऱ्यांवरील वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
काही भागांमध्ये सिलेंडर मिळण्यास उशीर होत असल्यामुळे घरगुती स्वयंपाकघरावरही त्याचा परिणाम होत आहे. सध्या लोकांना सिलेंडर संपल्याचं तेव्हाच लक्षात येतं, जेव्हा स्वयंपाक करताना अचानक गॅस बंद होतो. मात्र काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा अंदाज आधीच लावता येऊ शकतो.
सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पाण्याची ट्रिक. यासाठी एका ग्लासात किंवा मगमध्ये पाणी घेऊन सिलेंडरच्या वरून खाली हळूहळू ओतावे. काही सेकंदांनंतर, सिलेंडरला वरपासून खालपर्यंत हाताने स्पर्श करा.
ज्या भागापर्यंत सिलेंडर थंड वाटतो, त्या भागापर्यंत गॅस असल्याचे समजते. कारण सिलेंडरमधील द्रव उष्णता शोषून घेत असल्यामुळे त्या भागाचा बाहेरचा पृष्ठभाग थंड होतो. जर थंड भाग खूपच खालपर्यंत असेल तर समजावे की सिलेंडरमधील गॅस लवकरच संपणार आहे.
सिलेंडरमध्ये किती गॅस आहे याचा तुलनेने अचूक अंदाज वजनाच्या मदतीनेही लावता येतो. घरात वजन मोजण्याचे यंत्र असल्यास सिलेंडर त्यावर ठेवून एकूण वजन तपासता येते. त्यानंतर त्या वजनातून सिलेंडरचे रिकामे वजन वजा केले की उरलेल्या गॅसचा अंदाजा येतो. उदाहरणार्थ, जर सिलेंडरचे एकूण वजन 28.5 किलो आणि रिकामे वजन 15.5 किलो असेल, तर सिलेंडरमध्ये सुमारे 13 किलो गॅस शिल्लक असल्याचा अंदाज येतो.
सिलेंडरमध्ये गॅस कमी होत असल्याचे संकेत चुलीच्या जळण्यावरुन मिळू शकतात. जर गॅसची ज्वाळा पूर्वीपेक्षा कमी दिसू लागली किंवा तिचा रंग निळ्या ऐवजी पिवळसर दिसू लागला, तर सिलेंडरमधील गॅस कमी झाल्याचे ते लक्षण असू शकते. अशा वेळी अन्न शिजायला अधिक वेळ लागू शकतो. जर असे बदल जाणवू लागले तर उशीर न करता नवीन सिलेंडर बुक करा.
सध्याच्या परिस्थितीत एलपीजी पुरवठ्यावर काही प्रमाणात ताण असल्याने नागरिकांनी योग्य वेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सिलेंडर अचानक संपण्याची वेळ येऊ नये म्हणून घरातील गॅसची पातळी वेळोवेळी तपासा. या साध्या उपायांचा वापर केल्यास स्वयंपाकाच्या वेळी होणारी अडचण टाळता येईल आणि योग्य वेळी नवीन सिलेंडर बुक करता येईल.