

LPG Price Rise India: मध्य-पूर्वेत वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता भारतातील घरगुती गॅसच्या किमती आणि पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. ईरान-अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किमतींवर होत आहे. देशातील काही शहरांमध्ये गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात घट झाल्याच्या बातम्या समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
अलीकडेच तेल कंपन्यांनी घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि गॅसच्या दरात झालेली वाढ आणि मध्य-पूर्वेतील अस्थिर परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
या मागील मुख्य कारण म्हणजे ईरान आणि इस्रायल यांच्यात वाढलेला संघर्ष. ईरानजवळ असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅसचा पुरवठा होतो. या मार्गावर तणाव निर्माण झाल्याने जागतिक स्तरावर पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि गॅसचे दर वाढले आहेत आणि त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत आहे.
भारत मोठ्या प्रमाणावर एलपीजी आयातीवर अवलंबून आहे. देशातील घरगुती गॅसची जवळपास ६० टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. त्यापैकी सुमारे ८० ते ९० टक्के एलपीजी सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या मध्य-पूर्वेतील देशांमधून येतो. त्यामुळे या भागात कोणतीही अस्थिरता निर्माण झाली की त्याचा परिणाम भारतातील गॅस बाजारावर लगेच दिसून येतो.
७ मार्च २०२६ रोजी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुमारे ६० रुपयांची वाढ केली. त्यानंतर दिल्लीमध्ये १४.२ किलोचा विनाअनुदान सिलेंडर सुमारे ९१३ रुपयांपर्यंत पोहोचला.
त्याच वेळी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही ११४ ते ११५ रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत जवळपास १,८८३ रुपयांवर पोहोचल्या आहेत. मुंबई, बेंगळुरू आणि इतर मोठ्या शहरांमध्ये काही हॉटेल व रेस्टॉरंट्सनी गॅस पुरवठ्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. मध्य-पूर्वेत सुरु असलेले हे युद्ध आणखी काही काळ सुरु राहिल्यास एलपीजी सिलेंडरच्या किमती जवळपास शंभर रुपयांनी वाढतील असा अंदाज आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे उपाय केले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने तेल रिफायनऱ्यांना एलपीजीचे उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी सिलेंडर बुकिंगमधील अंतर २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था यांसारख्या अत्यावश्यक क्षेत्रांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य दिले जात आहे.
दरम्यान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नागरिकांना दिलासा देत घरगुती ग्राहकांसाठी गॅसचा तुटवडा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी घाबरून अतिरिक्त सिलेंडर साठवू नयेत आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मात्र मध्य-पूर्वेतील तणाव दीर्घकाळ कायम राहिला, तर जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेमुळे एलपीजीच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काळात गॅसच्या किमती आणि पुरवठ्याबाबत सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.