

Ladki Bahin Yojana January Installment: राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जानेवारी महिन्याचा ₹1,500 चा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक क्रेडिटचे मेसेज येऊ लागले असून, महिला व बालविकास विभागानेही हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
जानेवारीचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 18 फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास विभागाकडे सुमारे 98 कोटींची रक्कम वर्ग केली होती. ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर सोमवारपासून प्रत्यक्ष लाभार्थी खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पुढचा हप्ता कधी मिळणार याची माहिती सरकारने दिली नाही.
दरम्यान, डिसेंबर 2025 चा हप्ता जानेवारी महिन्याच्या मध्यात देण्यात आला होता. त्या वेळी सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. मात्र ई-केवायसी बंधनकारक केल्यानंतर लाभार्थींच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे चित्र समोर आले आहे.
ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली तेव्हा सुमारे 2 कोटी 46 लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यानंतर सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिले. यापैकी जवळपास 1 कोटी 90 लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली, मात्र कागदपत्रांतील त्रुटी आणि चुकीच्या पर्यायांमुळे सुमारे 1 कोटी 60 लाख पात्र महिलांनाच डिसेंबरचा हप्ता मिळाला.
महत्त्वाची बाब म्हणजे अनेक महिलांकडून ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरली गेली होती. ही चूक दुरुस्त करण्यासाठी आता शासनाने 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम संधी दिली आहे. चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थी महिलांना या कालावधीत ई-केवायसी सुधारण्याची सुट देण्यात आली आहे. आतापर्यंत जुलै 2024 पासून जानेवारी 2026 पर्यंत एकूण 19 हप्ते लाभार्थ्यांना मिळाले आहेत.