

कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्याचे शासनाने सोपविलेल्या कामावर बुधवारपासून अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार घातला आहे. हे काम अंगणवाडी कर्मचार्यांवर लादल्यास भव्य मोर्चा काढण्यात येईल, असे पत्रक कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड आप्पा पाटील व सरचिटणीस कॉम्रेड जयश्री पाटील यांनी दिले आहे.
अंगणवाडी सेविका व मतदनिसांवर योजना बाह्य कामे लादण्यात येत असल्यामुळे अंगणवाडीच्या नियमित कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. एकात्मिक बाल विकास योजनेच्या मूळ उद्दिष्टांची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने होत नसल्यामुळे अंगणवाडीमधील मुलांची संख्या कमी होत असून कुपोषणामध्ये वाढ होत आहे.
अंगणवाडी कर्मचार्यांना लाडकी बहीण योजनेचे काम लावू नये, यासंदर्भात वारंवार जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी ई-केवायसी कार्यक्रमावर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी काळ्या फिती लावून काम केले. याच मागणीसाठी अधिकारी महासंघ व पर्यवेक्षक संघटनांनी शासनाविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. शासनाने या कामातून अंगणवाडी सेविका मदतनीसांची मुक्तता न केल्यास पुढील काळात टप्प्याटप्प्याने तीव— आंदोलन करण्याचा इशाराही या पत्रकाद्वारे दिला आहे.