

गुडाळ; आशिष पाटील : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच या संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींसाठी राजकीय आरक्षण या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर आज (दि.१८) सुनावणी होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ लांबलेल्या या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या खंडपीठांसमोर या याचिकेची आज (दि.१८) सुनावणी होणे अपेक्षित आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद , बारा पंचायत समित्या, कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील अनेक नगरपालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयातील या प्रलंबित याचिकेमुळे दीर्घकाळ लांबणीवर गेल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपून येत्या ऑक्टोबर महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तर जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समित्यांची मुदत संपून सव्वा वर्ष उलटून गेले आहे. उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांची जोरदार तयारी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण आणि एकूणच संभाव्य निवडणुका याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार का? आणि त्यावर काय निर्णय होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा :