कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात ड्रोन प्रोग्रामिंग केंद्र

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात ड्रोन प्रोग्रामिंग केंद्र

कोल्हापूर : प्रवीण मस्के

शिवाजी विद्यापीठात ड्रोन प्रोग्रामिंग केंद्र उभारण्यात आले आहे. राज्यातील हे पहिले केंद्र असून येणार्‍या काळात ड्रोनच्या साहाय्याने कार्यक्षमता, उत्पादकता वाढवणे व सुरक्षिततेच्या द़ृष्टीने येणार्‍या समस्या सोडविणे शक्य होणार आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाकडे (रूसा) संशोधन प्रस्ताव सादर केला होता. त्याला 'सेंटर ऑफ एक्सलन्स सिस्टीम डिझाईन' असे नाव दिले असून 2 कोटी 50 लाखांचा निधी देण्यात आला आहे. या केंद्रातील एक विभाग ड्रोनवरील संशोधनाचे काम करीत आहे. डॉ. संतोष शिंदे, डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. कबीर खराडे, डॉ. कविता ओझा, डॉ. विजय कुंभार हे संशोधक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, चिपच्या क्षमतांचा शोध घेत आहेत. त्याचा मानवी जीवन
सुधारण्यासाठी उपयोग केला जाणार आहे.

सायबर सुरक्षेच्या द़ृष्टीने या केंद्रात स्पूफिंग व डिनायल ऑफ सर्व्हिस हल्ल्यांवर संशोधन केले जात आहे. सिस्टीम ऑन चिप आर्किटेक्चर व संबंधित चिप हार्डवेअर, अल्गोरिदमवरही काम सुरू आहे. ड्रोन फ्लाईट कंट्रोलर सिस्टीममध्ये नावीन्य आणण्यासाठी व ते वेगळे करण्यासाठी विविध प्रकारचे सेन्सर्स, इंटिग्रेटेड सर्किटस् व संदर्भ डिझाईन्सचा इंटरफेस करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संशोधक ड्रोन अधिक बुद्धिमान व स्मार्ट बनवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, डीप लर्निंग यासारखी तंत्रे विकसित करीत आहेत.'शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक द़ृष्टिकोन' ही यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम आहे. दिवसेंदिवस ड्रोनचा वापर वाढत असून कीटकनाशकाची फवारणी, पिकांच्या वाढीवर लक्ष ठेवणे या शेती कामांसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. रिअल इस्टेटमध्ये हवाई सर्वेक्षण, थ्री डी मॉडेलिंगसाठी ड्रोनचा वापर होत आहे.

पर्यावरण संवर्धन, वन्यजीव निरीक्षण, कायद्याची अंमलबजावणी, भौगोलिक मॅपिंग, पुरातत्त्व सर्वेक्षण, हवामान अंदाज, हवाई वाहतूक व्यवस्थापन, क्रीडा, पर्यटन, मनोरंजनासाठी ड्रोनचा वापर होत आहे. ड्रोन पायलट, ड्रोन अभियंता, ड्रोन प्रशिक्षक, आर अँड डी अभियंता, विश्लेषक, आयटी सपोर्ट, ऑन-फिल्ड सपोर्ट, असेंब्ली इंजिनिअर व बँक-ऑफिस सपोर्ट यातून विद्यार्थ्यांना रोजगार संधी मिळणार आहेत.

मानवरहित विमाने आणि ड्रोन तंत्रज्ञानामध्ये 2025 पर्यंत लाखांहून अधिक नवीन रोजगार संधी निर्माण होतील. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सेन्सर्ससह 'व्हीएलएसआय' सिस्टीम डिझाईनच्या समन्वयाने अभिनव प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. तो सामाजिक जीवनाला स्पर्श करेल.
– डॉ. आर. के. कामत, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान, शिवाजी विद्यापीठ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news