कर कशावर आकारला जातो? | पुढारी

कर कशावर आकारला जातो?

आपण आतापर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच रिटर्न भरले नसेल, तर आर्थिक वर्ष 2020-21 साठी दंडासह आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. आयटीआर भरताना खासगी कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आपल्या वेतनाच्या हिशोबानुसार कर भरावा लागेल. पण कर कोणत्या घटकांवर आकारला जातो, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

खासगी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना मिळणारी सीटीसी (कॉस्ट टू कंपनी) यात अनेक भाग असतात. यात मूळ वेतन, हाऊस रेंट अलाउन्स(एचआरए), महागाई भत्ता (डीए), व्हेरियबल पे रिइंबर्समेंट, लिव ट्रॅव्हल अलाउन्स (एलटीए), मेडिकल अलाउन्स, बोनस, प्रॉव्हिडंड फंड, फूड अलाउन्स आदींचा समावेश असतो. सीटीसीचे भाग कंपनीनुसार वेगवेगळे असतात. कंपनीकडून मिळणार्‍या सुविधांवरील कराची आकारणीदेखील वेगवेगळ्या मार्गाने केली जाते. कर्मचार्‍यांना मिळणारे भत्ते आणि जादा सुविधेच्या रचनेनुसार कर आकारणी होते. पैकी काही घटक करपात्र असतात, तर काही भागांवर सवलतही मिळू शकते.

यावर करसवलत नाही

मूळ वेतन : ही एक निश्चित रक्कम असते. कर्मचार्‍याने केलेल्या कामानुसार हे वेतन दिले जाते. यात बोनस, लाभ आणि अन्य भत्ते याचा समावेश नसतो. हे वेतन संपूर्णपणे करपात्र असते.

व्हेरिएबल पे : सीटीसीच्या या भागावर कर आकारणी केली जाते. हे कर्मचार्‍याच्या कामगिरीवर अवलंबून असते.

बोनस : कर्मचार्‍यांना मिळणारा बोनस हा पूर्णपणे करपात्र असतो. म्हणजेच एखादी कंपनी आपल्या कर्मचार्‍याला बोनस देत असेल तर त्यावर कर भरावाच लागतो.

ग्रॅच्युईटी : ग्रॅच्युईटीवर कर आकारणी होते. पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी कायद्यांतर्गत कंपनी येते की नाही यावर कर्मचार्‍याच्या ग्रॅच्युईटीवर कर आकारणी केली जाते.

आपली कंपनी पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी कायद्यानुसार येत असेल तर कलम 10(10) च्या नुसार प्रत्यक्ष रक्कम, वीस लाख रुपये आणि शेवटच्या वेतनाला 15 ने गुणणे, त्यानंतर 26 ने भागणेे आणि नंतर त्यास सेवेच्या कालावधीने गुणल्यास येणारी रक्कम मग त्या तिन्हीपैकी जी कमी असेल, त्यावर करसवलतीचा दावा करता येईल.

यावर मिळते करसवलत

एलटीए : प्राप्तिकर कायद्याच्या कलम 10 (5) नुसार लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्सवर करसवलतीचा दावा करता येतो. परंतु त्यासाठी काही अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.

करदात्याने देशांतर्गत हवाई प्रवास केला असेल तर त्यावर एलटीसीअंतर्गत करसवलतीचा दावा करता येऊ शकतो. कुटुंबासमवेत गेलेल्या प्रवासावर सवलत मिळू शकते. कुटुंबात जोडीदार, मुले आणि करदात्यावर अवलंबून असणारे आई वडील, भाऊ, बहीण याचा समावेश असतो. 1 ऑक्टोबर 1998 नंतर दोनपेक्षा अधिक जन्मलेल्या मुलांना ही सवलत मिळत नाही. अर्थातच, ही सवलत मिळवण्याठी काही नियम व अटी आहेत. चार कॅलेंडर वर्षात (2022-25) केवळ दोन वेळेसच एलटीएवर करसवलत मिळवता येते.

कंपनीच्या ईसॉपवर कर

ईसॉप (एम्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन) हा कर्मचारी बेनिफिट प्लॅन आहे. या माध्यमातून कर्मचार्‍यांना कंपनीच्या इक्विटीमध्ये भागीदारी मिळते. सर्वसाधारणपणे शेअरच्या फेअर मार्केट व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीवर ही भागीदारी कर्मचार्‍यांना मिळते. शेअरच्या दरातील या फरकावर कर्मचार्‍यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम 17(20) (6) नुसार अतिरिक्त लाभाच्या रूपाने कर भरावा लागतो.

जान्हवी शिरोडकर

Back to top button