कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 13) अंतिम प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. गॅझेटमध्ये प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गुरुवारी पुण्याला गेले होते. गॅझेटमध्ये शुक्रवारी दुपारी प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका निवडणूक कार्यालयासह शहरातील चारही विभागीय कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
दरम्यान, प्रभाग क्र. 2, 3, 12, 13, 14, 21, 27, 28 या प्रभागांत किरकोळ बदल झाल्याचे समजते. उर्वरित प्रभाग रचना महापालिका प्रशासनाकडून सादर झालेली तशीच ठेवण्यात आली आहे. इच्छुकांचे लक्ष प्रभाग रचनेकडे लागले आहे. महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचनेनुसार होत आहे. 92 नगरसेवकांसाठी 31 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. 3 नगरसेवकांचे 30 प्रभाग तर 2 नगरसेवकांचा 1 प्रभाग आहे.
महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी 2022 मध्ये प्रभाग रचना पूर्ण करून राज्य निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्यावर 115 हरकती आल्या होत्या; परंतु एकेकच हरकती वेगवेगवेळ्या नावांनी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी बहुतांश हरकती निकाली काढून त्यासंदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोगाला 4 मार्चला सादर करण्यात आला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत आरक्षण सोडतही निघण्याची शक्यता आहे; परंतु राज्य निवडणूक आयोगाकडून त्यासंदर्भात अद्याप आदेश नाहीत.