कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याचा केलेला क्रांतिकारी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे रोजी होणार्या अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी राबवावा. यासाठी परिपत्रक काढण्याचे आदेश दिले असून लवकरच हा कायदा अंमलात आणणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
हेरवाड ग्रामपंचायतीत विधवाबंदीच्या ठरवाबद्दल कायदा करण्यासाठी मुंबई मंत्रालयात गुरुवारी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर व खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते. बैठकीला हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
हेरवाड ग्रामपंचायतीने 4 मे रोजी झालेल्या गाव सभेत विधवा प्रथा बंदचा ऐतिहासिक ठराव केला आणि या ऐतिहासिक निर्णयाची दखल थेट मंत्र्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी या निर्णयाची दखल घेऊन हेरवाडचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. गावच्या विकासासाठी डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी 50 लाखांचा तर उपसभापती नीलम गोर्हे यांनीही महिलांच्या विकासासाठी 11 लाखांचा निधी जाहीर केला.यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, विधवा महिलांसंदर्भात असलेल्या धोरणात काही त्रुटी आहेत.त्यामध्ये बदल करून विधवा महिला प्रथा बंदीसाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.