सांगली : दर फरकामुळे सीमाभागातील इंधन विक्रीत 70 टक्के घट! | पुढारी

सांगली : दर फरकामुळे सीमाभागातील इंधन विक्रीत 70 टक्के घट!

सांगली : संजय खंबाळे

सध्या महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल 122 रुपये, तर डिझेल 103 रुपये लिटरने विक्री होत आहे. परंतु शेजारच्या कर्नाटक राज्यात मात्र महाराष्ट्रापेक्षा आठ ते दहा रुपये स्वस्त दराने पेट्रोल व डिझेलची विक्री होत आहे. त्यामुळे राज्याच्या सीमाभागातील लोक कर्नाटकात जाऊन इंधन आणत आहेत. परिणामी, राज्याच्या सीमावर्ती भागातील सुमारे 250 पेट्रोल पंपचालकांना याचा गंभीर फटका बसला आहे. महिन्याला 500 कोटी रुपयांची होणारी उलाढाल सध्या 150 कोटींवर आली आहे. त्यामुळे पंपचालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड हे सात जिल्हे कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहेत. या सीमाभागात सुमारे 250 पेट्रोल व डिझेल विक्रीचे पंप आहेत. एका पंपावर नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापूर्वी दररोज सात ते आठ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत होती. म्हणजेच 250 पंपांवर रोज 17 लाख 50 हजार, तर महिन्याला सुमारे 5 कोटी 40 लाख लिटर इंधनाची विक्री होत होती. यातून सुमारे 500 कोटी रुपयांची उलाढाल होत होती.

कर्नाटक सरकारने काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. परिणामी, महाराष्ट्रापेक्षा कमी दराने तिथे इंधनाची विक्री होत आहे. सध्या महाराष्ट्रात प्रतिलिटर सुमारे 122 रुपयांनी पेट्रोलची, तर 103.33 रुपये लिटरने डिझेलची विक्री होत आहे. कर्नाटकात 111.72 रुपयांनी पेट्रोल आणि 95.38 रुपयांनी प्रतिलिटरने डिझेलची विक्री होत आहे. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात 8 ते 11 रुपयांनी पेट्रोल, डिझेल कमी दराने मिळत आहे. त्यामुळे सीमाभागापासून 15 ते 20 किलोमीटर असणार्‍या गावांतील नागरिक कर्नाटकात जाऊन पेट्रोल, डिझेल भरून आणत आहेत. त्यामुळे राज्याच्या सीमाभागात असणार्‍या पंपांना याचा गंभीर फटका बसला आहे.

सीमाभागात दररोज एका एका पंपावर 7 हजार लिटर पेट्रोल, डिझेलची होणारी विक्री आज सुमारे 2 हजार लिटरवर आली आहे. महिन्याला 500 कोटी रुपयांची होणारी उलाढाल आज केवळ सुमारे 150 कोटी होत आहे, असे काही व्यावसायिकांनी सांगितले. 30 टक्केच व्यवसाय होत असून, 70 टक्के व्यवसायाला फटका बसल्याने पंपचालक आर्थिक संकटात आहेत.

या सीमाभागात पंपांचा देखभाल खर्चही निघत नसल्याचे काही पंपचालकांनी सांगितले. अनेकांनी कर्ज काढून पंप सुरू केला आहे. मात्र, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी व्यवसायच होत नसल्याने अनेकांसमोर गंभीर प्रश्न उभा झाला आहे. बँकेकडून मात्र पैसे भरण्यासाठी तगादा सुरू असल्याचे काही चालकांनी सांगितले. कर्नाटक सरकारप्रमाणे राज्यातही इंधनावरील व्हॅट कमी करून पंपचालक आणि नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

बाराशे कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गंडांतर

पेट्रोल पंपांवर नोकरी करून हजारो कर्मचार्‍यांचा उदरनिर्वाह होतो. मात्र, राज्यातील सीमाभागात पेट्रोल पंपांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून ते नांदेडपर्यंत असणार्‍या या पंपांवर सुमारे 1 हजार 200 कर्मचारी काम करतात. मात्र, व्यवसाय होत नसल्याने अनेक पंपचालकांनी कामगारांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा झाला आहे.

कर्नाटक सरकारप्रमाणे राज्यातील इंधनावरील व्हॅट कमी करण्याची मागणी शासनाकडे केली. मात्र, मागणीला उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. सीमाभागात पेट्रोल पंपांचा आज केवळ 20 टक्के व्यवसाय होत आहे. परिणामी, चालकांसमोर गंभीर प्रश्न उभे झाले आहेत.
– सुरेश पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा पेट्रोल पंपचालक असोसिएशन

पेट्रोल, डिझेलची सीमाभागात तस्करी

कर्नाटकातील पंपांतून वाहनांची टाकी भरून तसेच कॅन, बॅरेल भरून टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात सीमाभागात पेट्रोल, डिझेल आणण्यात येत आहे. राज्यात विक्री होणार्‍या पेट्रोल, डिझेलच्या दरापेक्षा 5 ते 6 रुपये कमी दराने त्यांची विक्री केली जात आहे. याभागातील काही तरुणांनी हा नवा उद्योगच सुरू केला आहे. सीमाभागात मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेलची तस्करी सुरू असताना पोलिस करतात काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button